अल्लापल्ली,
adv-yashwant-meshram देशाच्या लोकसंख्येतील निम्मा वाटा असलेल्या मातृशक्तीच्या सहभागाशिवाय राष्ट्राच्या विकासाची अपेक्षा करता येणार नाही. संस्कारित नारी, सशक्त परिवार, संघटित समाज आणि समर्थ राष्ट्र या चार सूत्रांच्या आधारे राष्ट्रनिर्माणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे प्रतिपादन अॅड. यशवंत मेश्राम यांनी केले. राष्ट्रसेविका समितीच्या विशाखा शाखा, अल्लापल्लीच्या वतीने 24 ऑक्टोबर रोजी क्रीडा संकुलाच्या पटांगणावर आयोजित विजयादशमी उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागेपल्ली येथील व्यावसायिक सौ. ललिता येलमुले उपस्थित होत्या.
‘प्रभाव से परिवर्तन की ओर’ या विषयावर मार्गदर्शन करताना अॅड. मेश्राम यांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मातृशक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. देशाच्या विकासात महिलांचा अविरत सहभाग राहिला आहे. त्यामुळे समाजपरिवर्तनाची सुरुवात कुटुंबापासून करून संस्कारित नारीच्या माध्यमातून सशक्त परिवार, संघटित समाज आणि समर्थ राष्ट्रनिर्मितीचा संकल्प करावा. राष्ट्र सर्वतोपरी ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रसेविका समितीच्या नगर कार्यवाह सौ. प्राजक्ता चव्हाण यांनी विजयादशमी उत्सवाचे महत्त्व विशद केले. असत्यावर सत्याचा, दुष्ट शक्तींवर सज्जन शक्तींचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून विजयादशमी साजरी केली जाते, असे त्यांनी सांगितले. समितीमध्ये सहभागी झाल्यानंतर स्वतःच्या विचारांत आणि व्यक्तिमत्त्वात झालेल्या परिवर्तनाचा अनुभवही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमात श्लोक, अमृतवचन, एकलगीत, प्रात्यक्षिके आणि समूहगीत सादर करण्यात आले. सर्व सेविका गणवेशात उपस्थित होत्या. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या विजयादशमी उत्सवाची सांगता ‘वंदे मातरम’ने करण्यात आली.