दुष्काळग्रस्त शेतकर्‍यासाठी २ नोव्हेंबरला कारंजात आक्रोश मोर्चा

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड,
protest-march दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि इतर कामगारांना आर्थिक मदत मिळावी, तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात, या मागण्यासाठी शेतकरी एल्गार समिती, वाशीम जिल्ह्याच्या वतीने सोमवार, २ नोव्हेंबर रोजी कारंजा येथे दुष्काळी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे मार्गदर्शक नेतृत्व डॉ. पंकज काटोले करणार असून, झाशी राणी चौक, बायपास येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे.
 
 
protest-march
 
‘जय जवान, जय किसान, जय संविधान’, ‘शेतकरी वाचवा, शेतमजूर वाचवा’ असा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. ‘ लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा शेतकरी जिवंत राहिला पाहिजे’, हा संदेश या आंदोलनातून देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेटर एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच शेतमजूर व इतर कामगारांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपयांची मदत मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. महिला बचत गटांचे बँक व सूक्ष्म वित्त संस्थांकडून घेतलेले कर्ज माफ करावे, तसेच एपीएल, बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती १० किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात येणार आहे. कोरडा दुष्काळ संपेपर्यंत शेतकरी, शेतमजूर आणि इतर कामगारांची घरगुती वीजबिले माफ करावीत. ट्रॅटर व इतर वाहनांवरील कर्जाचे व्याज एक वर्षासाठी माफ करून कर्जाचे हप्ते स्थगित करावेत, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आयोजकांनी केली आहे.
 
 
या मोर्चात प्रमुख वक्ते म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर, विष्णुपंत भुतेकर, दामू अण्णा इंगोले, श्रीधर पाटील कानकिरड आणि ज्योती गणेशपुरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी एल्गार समितीचे अध्यक्ष राजू आवताडे यांच्या संकल्पनेतून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.