देऊळगावराजा,
anand-pandey जगात विचारांसोबतच शक्तीलाही विशेष स्थान आहे. शक्तीशिवाय जगात कोणी विचार करत नाही. दुर्बल असणार्या घटकाला देवही साथ देत नाही, म्हणूनच राष्ट्ररक्षणासाठी शक्ती आणि संयम दोन्ही आवश्यक आहे. संघाचे काम सुद्धा व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माणाचे आहे. संघ शाखेतून चारित्र्य संपन्न सुसंस्कारित व अनुशासित व्यक्ती निर्माण होऊन राष्ट्र प्रथम या समर्पित भावनेने जीवन जगतात अशा संघटीत व्यक्तींच्या माध्यमातून समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात चांगले परिवर्तन घडते. सेवा समर्पणातून राष्ट्र बलशाली होण्यासाठीच संघाचे काम आहे असे प्रतिपादन रा.स्व.संघ विदर्भ प्रांत सहबौध्दिक प्रमुख आनंद पांडे ह्यांनी केले. रा.स्व.संघ देऊळगाव राजा येथे विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देऊळगाव राजा नगराचे वतीने स्थानीक आर्या लॉन्स येथे दि.२६ ऑटोबर रोजी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वयंसेवकांनी सांघिक गीत, दंडयोग व व्यायामयोगाचे प्रात्यक्षिक सदर केले. या प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि देऊळगाव शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष ओमप्रकाश धन्नावत, जिल्हा संघचालक सुभाष मोरे व नगर संघचालक पुरुषोत्तम धन्नावत विराजमान होते. १८३५ च्या लॉर्ड मेकॉलेचा डायरीतील नोंदींचा हवाला देत पुढे बोलताना आनंद पांडे म्हणाले की पूर्वी भारतभूमी अत्यंत संपन्न व सुसंस्कृत होती. इंग्रजांनी येथील व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल केले. परंतु आज गरज आहे ती आपल्या प्राचीन सुसंस्कृत मूल्यांची जोपासना करण्याची.
संघाचे तीन टप्पे आणि कार्यपद्धतीः संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासात संघकार्याचे प्रामुख्याने तीन टप्पे आहेत संघटन व कार्यकर्ता निर्मितीः डॉ. हेडगेवार यांच्या काळातील शाखा विस्तार व शिस्त. व्यवस्था परिवर्तन-समाजजीवन सुधारणे, श्रमसंस्कार, आणि विविध क्षेत्रांत राष्ट्रीय विचारांची संघटना उभी करणे तसेच कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, स्वदेशी जीवनशैलीचा स्वीकार आणि नागरिक कर्तव्ये यांचे पालन करण्याचा माध्यमातून समाज परिवर्तन करणे व समाज परिवर्तनासाठी कुटुंबातील संवाद टिकवणे, मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून दूर राहणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लॅस्टिकमुक्तीचा अवलंब करणे, सामाजिक समरसता वाढवणे आणि प्रत्येकाने स्वतःच्या दैनंदिन व्यवहारात ’स्वदेशी’ वस्तूंचा वापर करून स्वावलंबी बनणे असे स्वतःला घडवून ज्यात देशाचे भले आहे असे काम सर्वांनी करणे अत्यंत गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी ओमप्रकाश धन्नावत यांनी विजयादशमीच्या उत्सवाचे महत्त्व विशद केले तसेच संघ कार्याचा गौरव करताना सांगितले की सेवा, समर्पण, शिस्त म्हणजेच संघ. राष्ट्रसेवेचे हे व्रत अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असून, संघाचा विचार म्हणजे समाजाच्या कल्याणाचे आणि विचारांचे एक सामूहिक चिंतन आहे, जे समाजाला कायम दिशादर्शक ठरते. कार्यक्रमाचे परिचय व आभार प्रदर्शन नगर संघचालक पुरुषोत्तम धन्नावत यांनी केले. कार्यक्रमापूर्वी गणवेशधारी स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध व भव्य सघोष पथसंचलन दुपारी ४:३० वाजता आर्या लॉन्स येथून निघून शहरातील प्रमुख मार्गानी मार्गक्रमण करत कार्यक्रमस्थळी पोहचले. देऊळगाव राजा शहरवासियांनी पथसंचलनाचे उत्स्फूर्त भव्य स्वागत केले. कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती उपस्थित होती.