वडोदरा
third-odi युवा डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने ३९ धावांत पाच बळी घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. तिच्यापाठोपाठ प्रतिका रावल (५९ नाबाद) आणि शेफाली वर्मा (५१ नाबाद) यांनी अर्धशतके झळकावली. या बळावर भारतीय महिला संघाने बुधवारी येथे झालेल्या तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला आठ गडी आणि सुमारे ३३ षटके राखून पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० ने निर्भेळ यश मिळवले. भारताने केवळ दोन गडी गमावून १७ षटकांत १३२ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. सामनावीर वैष्णवी शर्मा, तर मालिकावीर प्रतिका रावल ठरली. तिने मालिकेत २२० धावा केल्या.
वैष्णवीच्या फिरकी गोलंदाजीने झिम्बाब्वेचा संघ ३९.५ षटकांत केवळ १३१ धावा काढून बाद झाला. आपला तिसरा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या २० वर्षीय वैष्णवीने १० षटकांत ३९ धावा देऊन पाच बळी घेतले. तिने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही चार बळी घेतले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना, प्रतिकाने ५६ चेंडूंमध्ये नाबाद ५९ धावा केल्या, तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शेफाली वर्माने आक्रमक खेळी करत २६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा करून भारताला सहज विजय मिळवून दिला.
कर्णधार स्मृती मंधानाने प्रतिकासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी यस्तिका भाटियाला पाठवले, परंतु डावखुरी फलंदाज या संधीचा फायदा उठवू शकली नाही. आपल्या पहिल्याच चेंडूवर क्रॉस-बॅट शॉट मारण्याचा प्रयत्न करताना ती मिड-ऑनला झेलबाद झाली.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये १०० आणि ६१ धावा करणाऱ्या प्रतिकाने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांविरुद्ध सहज फलंदाजी केली. तिने चौकार मारून डावाची सुरुवात केली आणि आपल्या ३०व्या एकदिवसीय सामन्यात १०वे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर शेफाली मैदानावर येताच वेगाने धावा करू लागली. तिने चौकारांची उधळण करत लक्ष्य सोपे करून दाखवले आणि प्रतिकासोबत मिळून भारताला विजय मिळवून दिला.
वीस वर्षीय वैष्णवीच्या डावपेचांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना सातत्याने जाळ्यात अडकवले. पाहुण्या संघाकडून सलामीवीर मॉडेस्टर मुपाचिकवाने ४८ चेंडूंमध्ये ३७ धावा करून सर्वाधिक योगदान दिले. भारत दौऱ्यावर फलंदाजीसाठी धडपडणाऱ्या झिम्बाब्वेला सुरुवातीच्या षटकांमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. वेगवान गोलंदाज सायली सातघरेने तिच्या पहिल्याच षटकात सलामीवीर लोरिन फिरीला यष्टीमागे यास्तिका भाटियाकरवी झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली चिपो मुगेरी-तिरिपानो सुद्धा जास्त वेळ टिकू शकली नाही. क्रांती गौडच्या चेंडूवर कट शॉट मारण्याच्या प्रयत्नात ती पॉइंटवर शेफाली वर्माकरवी झेलबाद झाली.
त्यानंतर वैष्णवीने तिच्या फिरकीची जादू दाखवली. प्रथम, तिने बिलोव्हेड बिझाला बाद केले आणि नंतर चतुराईने फॉर्मात असलेल्या मुपाचिकवाला चकवले. मुपाचिकवा क्रीजच्या बाहेर खेळण्याचा विचार करत आहे हे ओळखून, वैष्णवीने चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकला. फलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकली नाही आणि यष्टीरक्षक यास्तिकाकरवी यष्टिचित झाली.
वैष्णवीने तिचा पाचवा बळी तिच्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर घेतला. न्याशा ग्वांजुराने एक मोठा स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू तिच्या पॅडला लागून यष्टींवर आदळला. वैष्णवीच्या शानदार कामगिरीसोबतच, क्रांती गौड आणि सायली सातघरे यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. एकदिवसीय सामन्यांपूर्वी भारताने टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकाही ३-० ने जिंकली.