चंद्रपूर
tiger attack जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कलमसिंह पंचमसिंह उईके (65, रा. खापा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. बांबू कटाईच्या कामासाठी जंगलात गेलेले कलमसिंह मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. बुधवार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी शोधमोहीम राबविताना त्यांचा मृतदेह आढळून आला.
कलमसिंह उईके हे जंगल ठेकेदार सुखविंदरसिंग भोये यांच्याकडे बांबू कटाईचे काम करण्यासाठी आले होते. 27 ऑक्टोबर रोजी ते अन्य मजुरांसोबत जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलातील कक्ष क्रमांक 460 मध्ये बांबूंचे बंडल बांधण्यासाठी गेले होते. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास इतर मजूर परतले; मात्र कलमसिंह परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. रात्र होऊनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. बुधवारी सकाळपासून सहकारी मजुरांनी जंगल परिसरात त्यांचा शोध सुरू केला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले.
घटनेची माहिती एफडीसीएमच्या अधिकार्यांना देण्यात आली. त्यानंतर डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावरून पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
या घटनेमुळे गिलबिली जंगल परिसरात काम करणार्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगलात काम करताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.