शक्तिजागरणातून समाजसंघटनाला बळ मिळतेः प्रांत सहप्रचारक परीक्षित जावळे

विजयादशमी उत्सवात शिस्त, संघटन आणि संस्कारांचा जागर

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
वाशीम,
vijayadashami-festival भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा शक्तिजागरण, संघटन आणि विजयाचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. समाजात शिस्त, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय विचारांची भावना दृढ करण्यासाठी अशा उत्सवांचे विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहप्रचारक परीक्षित जावळे यांनी केले.
 
 
vijayadashami-festival
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंगळा मंडळाच्या वतीने सोमवार, २६ ऑटोबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मालेगाव खंड कार्यवाह विनोद उंडाळ आणि संस्कार विद्या मंदिर, मेडशीचे सचिव दत्तराव घुगे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. उत्सवानिमित्त सायंकाळी ५ वाजता श्री गजानन महाराज मंदिर संस्थान येथून पथसंचलनाला प्रारंभ झाला. माळी वेटाळ, तेली वेटाळ, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मुंगसाजी महाराज मंदिर आणि जैन मंदिर या मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले.गणवेशधारी स्वयंसेवकांची शिस्तबद्ध वाटचाल आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे पथसंचलनाचे विशेष आकर्षण ठरले. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी स्वयंसेवकांचे स्वागत केले. सायंकाळी ६ वाजता श्री गजानन महाराज मंदिर संस्थान येथे मुख्य उत्सव पार पडला. यावेळी शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांनी विविध व्यायामप्रकार आणि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. या माध्यमातून शारीरिक क्षमता, शिस्त आणि संघभावनेचे दर्शन घडविण्यात आले.
 
 
कार्यक्रमात वल्लभ पाठक यांनी सांघिक गीत, तर मनोज बेलोकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. त्यानंतर संघप्रार्थना, अमृतवचन आणि सुभाषिताचे सादरीकरण झाले. प्रमुख वक्ते परीक्षितजी जावळे यांनी विजयादशमीचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विशद करताना समाजात एकात्मता, शिस्त आणि संघटनभावना वृद्धिंगत करण्यावर भर दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मालेगाव खंड सहकार्यवाह नंदकिशोर वनस्कर यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आभार मानले. गणवेशधारी स्वयंसेवकांसह शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात विजयादशमी उत्सवाची सांगता झाली.