जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर युवकाची हत्या

आरोपीला अटक

    दिनांक :28-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर,
youth-murdered शहरातील अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरच एका युवकाची सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाची ओळख रंजीत सुरेश राजवंशी (36, रा. बल्लारशाह) अशी पटली आहे. तर, अमन दीपक कुरवे (29, रा. पंचशील चौक, जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
youth-murdered
 
जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील श्रीमान सावजी भोजनालयासमोर मंगळवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास अमन कुरवे याने रंजीत राजवंशी याच्यावर पेव्हर ब्लॉकने हल्ला केला. हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या युवकाच्या डोक्यावर सलग 6 ते 7 वार केले. भररस्त्यात हा प्रकार घडत असताना परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती कळताच जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचू शकला नाही.
 
 
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. रंजीत राजवंशी हा घटनेच्या दिवशी दुपारीच उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आला होता. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तो कोणालाही काही न सांगता रुग्णालयातून निघून गेला होता. त्यानंतर रात्री त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. रुग्णालयातील कागदपत्रांच्या आधारेच मृत युवकाची ओळख पटविण्यात पोलिसांना मदत झाली.
 
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत हत्येच्या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात आरोपी अमन कुरवे याला अटक केली. रंजीत राजवंशी याची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, मृतक आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून काही वाद होता का, हल्ल्यामागे वैयक्तिक वैमनस्य होते का आदी कारणांचा तपास पोलिस करीत आहेत.