मुंबई
zeeshan siddique राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील संघटनात्मक नेतृत्वात महत्त्वाचा बदल केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्या पुढाकाराने आमदार झिशान सिद्दिकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पार्थ पवार यांनी स्वतः झिशान सिद्दिकी यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी झिशान यांनीही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. आता विधान परिषद सदस्य असलेल्या झिशान यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
झिशान सिद्दिकी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला होता. वयाच्या २७व्या वर्षी विधानसभेत प्रवेश करत त्यांनी त्या काळातील सर्वांत तरुण आमदारांमध्ये स्थान मिळवले होते. यापूर्वी त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. युवक संघटनेतील कामाचा अनुभव आणि मुंबईतील राजकीय संपर्क यांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांच्यावर नव्या जबाबदारीसाठी विश्वास दाखवला आहे.
मात्र, झिशान सिद्दिकी यांच्या राजकीय प्रवासाला त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर मोठे वळण मिळाले. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर झिशान यांच्या राजकीय वाटचालीकडेही विशेष लक्ष दिले जाऊ लागले.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी झिशान यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना ४६ हजार ३४३ मते मिळाली; मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर आता थेट मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षातील त्यांचे स्थान अधिक महत्त्वाचे ठरले आहे.पार्थ पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आल्याने या निर्णयाला पक्षांतर्गत नेतृत्वाच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या राजकीय केंद्रात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाणे, अशी जबाबदारी झिशान सिद्दिकी यांच्यासमोर असेल. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात कोणते बदल घडतात, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.