हिवरखेडमध्ये संशयित भेसळीचे ३,६०० किलो सोयाबीन तेल जप्त

जय भोले किराणा शॉपचा परवाना निलंबित: एफडीएची कारवाई; ५ लाख ५० हजार ८०० रुपयांचा साठा जप्त

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
अकोला
fda-action तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील मे. जय भोले किराणा शॉपवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. रिफाइंड सोयाबीन तेलात भेसळ असल्याचा संशय आल्याने ३ हजार ६०० किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत ५ लाख ५० हजार ८०० रुपये आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनेचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला.
 

fda
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढत असल्याने एफडीएचे धाडसत्र सुरू आहे.दरम्यान हिवरखेड येथे मे.जय भोले किराणा शॉपी मध्ये केलेल्या तपासणीत तेलाचा नमुना प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे.दरम्यान तपासणीदरम्यान आस्थापनेत स्वच्छतेच्या नोंदी, कच्च्या अन्नपदार्थांच्या नोंदी आणि आवश्यक अभिलेख उपलब्ध नसल्याचे आढळले. अन्नपदार्थ हाताळण्याच्या पद्धतीनुसार नोंदी ठेवण्यात आल्या नव्हत्या. कच्चे व तयार अन्नपदार्थ पॅलेटवर ठेवण्याऐवजी थेट जमिनीवर ठेवले होते. कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी खिडक्यांना बारीक जाळ्या नव्हत्या. तसेच साठ्याची नोंद ठेवणारे स्टॉक रजिस्टरही उपलब्ध नव्हते.स्वच्छता, साठवणूक आणि अभिलेख व्यवस्थापनातील त्रुटी अन्नसुरक्षा व मानके नियमांतील शेड्यूल ४ च्या विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याने परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावतीचे सहआयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) देवानंद वीर आणि अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली.