मुंबई
aamne saamne marathi natak controversy मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय ‘आमने सामने’ या नाटकाभोवती सुरू झालेला वाद आता पुन्हा चर्चेत आला आहे. अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांनी नाटकातून अचानक वगळण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाटकाच्या निर्मात्या आणि अभिनेत्री लीना भागवत यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. मात्र, आता रोहन आणि केतकी यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर करत मानधनवाढीच्या मुद्द्यावर आपली बाजू मांडली आहे. गेल्या आठ वर्षांत आपण केवळ तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितली होती, एका वर्षात तीनदा नव्हे, असं त्यांनी स्पष्ट केलं. कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्याला नाटकातून बदलण्यात आल्याची खंतही दोघांनी व्यक्त केली.
‘आठ वर्षांत तीनदा मानधनवाढ, एका वर्षात नाही!
निर्मात्या लीना भागवत यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावरील प्रतिक्रिया आणि कमेंट्सही आपण वाचल्याचं रोहन आणि केतकी यांनी सांगितलं. नाण्याची दुसरी बाजू ऐकल्यानंतरही काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही गोष्टी अनावधानाने, चुकून किंवा सोयीस्करपणे सांगितल्या गेल्या नसाव्यात, असं नमूद करत हे मुद्दे स्पष्ट करण्यासाठीच नवा व्हिडीओ केल्याचं त्यांनी सांगितलं. या व्हिडीओनंतर आणखी स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ करण्याची इच्छा नसल्याचंही दोघांनी स्पष्ट केलं.
रोहनच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठ वर्षांत ही तिसरी मानधनवाढ होती. मात्र, सध्या लोकांमध्ये एका वर्षात तीनदा मानधनवाढ मागितल्याचा समज निर्माण झाला आहे, जो चुकीचा आहे. आठ वर्षांच्या कालावधीचा विचार केला, तर सरासरी अडीच वर्षांनी एकदा मानधनवाढ मागितल्याचं तो म्हणाला.
पहिल्या दोन मानधनवाढींबाबत काय म्हणाला रोहन?
रोहनने पहिल्या मानधनवाढीचा संदर्भ देताना सांगितलं की, नाटक सुरू झाल्यानंतर चार वर्षांनी पहिल्यांदा मानधन वाढवण्यात आलं होतं. ही वाढ अत्यंत किरकोळ होती, हे निर्मात्यांनीही मान्य केल्याचं त्याने नमूद केलं. त्यानंतर दुसरी मानधनवाढ सहा वर्षांनी झाली. या काळात नाटक एकदा बंद पडलं आणि नंतर पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलं. नाटकाचे प्रयोग जवळपास चार महिने हाऊसफुल्ल होत होते. त्यानंतर कलाकारांनी मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला होता.
सहा वर्षांच्या कालावधीनंतर मूलभूत मानधनात जितकी वाढ अपेक्षित होती, तितकीच मागणी आपण केली होती, असं रोहनने सांगितलं. या संदर्भातील संदेश आपल्याकडेही असल्याचं त्याने स्पष्ट केलं. निर्मात्यांनी कलाकारांच्या मागण्या सहज मान्य केल्या, असं म्हणणं योग्य नसल्याचंही त्याने नमूद केलं. निर्मात्यांनी स्वतःला मुरड घालून मानधनवाढ केल्याचं सांगितलं होतं. म्हणजेच, ही वाढ त्यांनी मनाविरुद्ध मान्य केली होती, असं रोहनचं म्हणणं आहे. यानंतर वर्षभराने तिसऱ्यांदा मानधनवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
लॉकडाऊनमध्ये अर्ध्या मानधनावर केले प्रयोग
नाटकाची टीम म्हणून आपण सातत्याने सहकार्य केल्याचं सांगताना रोहन आणि केतकी यांनी लॉकडाऊनच्या काळातील प्रसंगाचाही उल्लेख केला. नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत असताना निर्मात्यांनी स्वतःहून मानधनवाढीचा प्रस्ताव कधी दिला नाही, असं रोहन म्हणाला. मानधनवाढीची मागणी करतानाच भविष्यात नाटकाचा प्रतिसाद कमी झाला, तर कमी मानधनातही प्रयोग करण्याची तयारी असल्याचं आपण निर्मात्यांना सांगितलं होतं. कारण आपल्याला हे नाटक शेवटपर्यंत करायचं होतं, असं त्याने स्पष्ट केलं.
लॉकडाऊननंतर नाटकाचे प्रयोग ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू झाले होते. त्या वेळी निर्मात्यांनी कलाकारांना ५० टक्के मानधनावर काम करण्याची विनंती केली होती. ही विनंती आपण तात्काळ मान्य केली आणि अर्ध्या मानधनावर प्रयोग केले, असं रोहनने सांगितलं. त्यामुळे सात वर्षांपासून नाटकासोबत असलेल्या कलाकारांची बांधिलकीही लक्षात घेतली पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे.
दीड हजार रुपयांच्या वाढीवरून नाराजी
रोहनच्या म्हणण्यानुसार, नाटकासोबत सातत्याने काम करणाऱ्या कलाकारांनी टीम म्हणून दीड हजार रुपयांची मानधनवाढ मागितली होती. मात्र, या मागणीवर चर्चा करण्याऐवजी निर्मात्यांनी तडकाफडकी निर्णय घेत आपल्याला दुसऱ्या कलाकारांनी बदलल्याचं त्याचं म्हणणं आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेण्यात आल्याने दोघांनाही वाईट वाटल्याचं त्यांनी सांगितलं.
या प्रकरणात मानधनवाढीच्या मागणीपेक्षा अनेक वर्षे एकत्र काम केल्यानंतर मिळालेल्या वागणुकीची खंत अधिक असल्याचं रोहन आणि केतकी यांच्या वक्तव्यांतून दिसून येतं. ‘आमने सामने’ नाटकाच्या या वादात दोन्ही बाजूंकडून स्पष्टीकरण समोर आलं असून, कलाकारांनी आता आपली बाजू मांडल्यानंतर या प्रकरणाची पुढील चर्चा कशी होते, याकडे मराठी रंगभूमीवरील प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.