गोंदिया,
sarus crane conservation सारस पक्ष्यांचे संवर्धन, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील घाटटेमनी येथे १०० एकर शेतीक्षेत्रावर देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक शेती आणि सारस संवर्धन यांची सांगड घालणार्या या उपक्रमातून शेतकर्यांचे उत्पन्न, मातीचे आरोग्य, जैवविविधता आणि पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण यावर एकत्रितपणे भर दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार, आगामी दोन वर्षांत राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील घाटटेमनी येथे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येत आहे. सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या गावातील शेती नैसर्गिक पद्धतीने करण्यासाठी गुजरातमधील नैसर्गिक कृषी विज्ञान विद्यापीठ मित्रा आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून नियोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नैसर्गिक कृषी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाची प्रगती, शेतकर्यांचा सहभाग आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील कामांचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण...
या प्रकल्पाच्या अनुषंगाने गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, उपवनसंरक्षक पवन जोंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, गुजरातमधील नैसर्गिक कृषी विज्ञान विद्यापीठाचे डॉ. स्वप्नील देशमुख व डॉ. रघुनंदन बी.एल., मित्राचे प्रतिनिधी विनायक झोडे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मुकुंद धुर्वे, सेवा संस्थानचे सावन बहेकार, तेजस बनकर आदी उपस्थित होते.sarus crane conservationयावेळी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, सारस पक्ष्यांचे संवर्धन आणि या दोन्ही घटकांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
देशातील पहिला प्रयोग...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. परसराम पाटील यांच्यासह उपस्थित तज्ज्ञांनीही या उपक्रमाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. घाटटेमनी येथील १०० एकरांवरील हा प्रकल्प सारस संवर्धन आणि नैसर्गिक शेतीला एकत्रित प्रोत्साहन देणारा देशातील पहिला प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.