हिंगणघाट,
prabha-rao-vikahar-manch शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस गर्तेत जात आहे. या धोरणाच्या निषेधार्थ गुरुवार २९ रोजी प्रभा राव विचार मंचच्या नेत्या चारुलता राव (टोकस) यांच्या सूचनेनुसार मंचचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उपासे यांच्या नेतृत्वात जाम चौरस्ता येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दुष्काळग्रस्त शेतकर्यांना १ लाख रुपये मदत देऊन सक्तीची वसुली बंद करा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ३६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर एक तासाने हा महामार्ग मोकळा करण्यात आला.
यावेळी प्रवीण उपासे यांनी शेतकरी अपुऱ्या पावसामुळे चिंतेत सापडला असून जिल्ह्यातील पांढरे सोनं सरकारच्या उदासीन धोरणामुळे काळवंडल्या गेले आहे. यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे तसेच वाढलेले खताचे भाव, महागलेले बी-बियाणे पेरूनही पावसाअभावी उगवण क्षमता कमी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना १ लाख रुपयांची मदत करण्याची मागणीही त्यांनी केली.
कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये, सोयाबीनला १० हजार रुपये दर देण्यात यावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एक लाखाची मदत द्यावी, कर्जमाफीची रक्कम त्वरित बँकेत जमा करून शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून द्यावे, पीक विमा योजना त्वरित लागू करण्यात यावी, शेतातील सौर ऊर्जा योजना रद्द करून पूर्ववत वीज उपलब्ध करून द्यावी, खाजगी सावकार व फायनान्स कंपनींकडून होणाऱ्या कर्ज वसुलीला पायबंद घालावा, रासायनिक खताचे भाव रद्द करून खतासाठी ऑनलाईन नोंदणी बंद करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.