नागपूर
diwali दिवाळीचा सण जवळ येताच पारंपरिक मातीच्या पणत्यांपासून नक्षीकाम केलेल्या सजावटीच्या दिव्यांपर्यंत विविध पर्याय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ लागले आहेत. नागपूरच्या इतवारी, महाल, सीताबर्डी, सदर, मानेवाडा बाजारात पणत्यांचे ढीग लागले आहेत. मात्र, यंदा पणत्यांच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे काही ग्राहकांनी नवीन पणत्यांच्या खरेदीस कात्री लावत जुन्याच पणत्या पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतल्याची परिस्थिती नागपूरसह सर्वत्र आहे.
दिवाळी आणि पणत्या - अतूट नाते
दिवाळी आणि पणत्या यांचे अतूट नाते आहे. घराचे अंगण, खिडक्या, सज्जे आणि देवघर पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. पूर्वी साध्या मातीच्या पणत्यांना प्राधान्य दिले जात होते. आजी म्हणायची - ‘मातीच्या पणतीत लक्ष्मी येते.‘आता मात्र पारंपरिकतेसोबत आधुनिक सजावटीची जोड मिळाल्याने पणत्यांचे स्वरूपही बदलले आहे.
नागपूरच्या बाजारात काय नवीन?
- कमळ, मोर, शंख, हत्ती, स्वस्तिक आणि तुळशी वृंदावनाच्या आकारातील दिवे. नागपूरकरांची सर्वात जास्त मागणी. महालात ४० ते १५० रुपयाला एक.- कुंदन, मोती, टिकल्या आणि चमकदार खड्यांनी सजवलेल्या पणत्या - महिलांची पहिली पसंती. धरमपेठमध्ये ५० ते ५०० रुपयाला.
- हंडी, लामणदिवे, नारळाच्या आकारातील दिवे, वॉल हँगिंग - बंगल्यांसाठी, १०० ते ३०० रुपये.-पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या -यंदा सर्वात ट्रेंडिंग. पाण्याच्या भांड्यात टाका, आपोआप उजळते. ८० ते २०० रुपयाला संच. सीताबर्डीत तरुणींची गर्दी.
- मॅजिक व मॅग्नेटिक फ्लोटिंग कॅंडल्स - जादूसारखी हवेत तरंगते, २५० रुपयाला.- काचेचे दिवे, समई - २,००० रुपयांपर्यंत.
- एलईडी पणत्या - तेल नाही, वात नाही, बटण दाबा, उजळली. नग ४० रुपये, संच १५० रुपये.
किमती का वाढल्या? कुंभारांचे दुःख
मातीचे वाढलेले दर, वाहतूक खर्च आणि कारागिरांची मजुरी यामुळे पणत्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. नागपूरच्या कुंभारपुरा येथील कारागीर रमेश प्रजापती म्हणतात, ‘माती पूर्वी ५०० रुपये ट्रॉली होती, आता १,२०० रुपये झाली. ट्रक भाडे दुप्पट झाले. मजूर ५०० रुपये रोज घेतो. आम्ही २० रुपये डझनने पणती दिली तर आम्हाला परवडत नाही. म्हणून २५ ते ४० रुपये डझन करावी लागली.