rape and murder एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिच्या तीन वर्षांच्या मुलाची हत्या करणारा नराधम संजू विश्वनाथ सरकार याची फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली असता त्यांनी निर्णय राखून ठेवला होता, हे विशेष.
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील एका खेड्यात राहणाऱ्या महिलेचा पती मोलमजुरीसाठी आंध्र प्रदेशात गेला होता. त्यामुळे शेजारी राहणारा आरोपी १९ जून २०१७ रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे दोन वाजता महिलेच्या घरात शिरला. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, महिलेने नकार दिला. त्यामुळे तो बळजबरी करायला लागला. महिलेने स्वत:चा बचाव करण्यासाठी झटापट केल्याने तिचा मुलगा झोपेतून जागा होऊन रडायला लागला. परिणामी, आरोपीने त्या निष्पाप मुलाला नाक व तोंड दाबून ठार मारले. तसेच, तो महिलेचा गळा चाकूने चिरून पळून गेला.rape and murder ती महिला सकाळी उशिरापर्यंत घराच्या बाहेर दिसली नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घराच्या आत डोकावून पाहिले असता अंगावर काटा आणणारे दृश्य दिसले. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिचा मुलगा खाटेवर मृतावस्थेत होता. महिलेला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर तिने थरारक घटनाक्रम सांगितला.