माधुरी दीक्षितची गौतमी पाटीलला खास फर्माइश

‘पाटलांचा बैलगाडा’ची हुकस्टेप पाहून माधुरीने वाजवल्या टाळ्या

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
मुंबई
madhuri dixit  ‘आपल्याला खेळ आता कातिल करायचा आहे!’ असं म्हणत अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात रंगत आणणार आहे. सोनी मराठीवरील या लोकप्रिय कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता शिव ठाकरे हॉटसीटवर बसून माधुरीसोबत गप्पा मारताना दिसणार आहेत. माधुरीचं दिलखुलास सूत्रसंचालन, पाहुण्यांचे मजेशीर किस्से आणि गौतमीच्या नृत्याची खास झलक यामुळे हा भाग मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.
 

madhuri dixit  
‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर यापूर्वी सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले, रेणुका शहाणे, प्रिया बेर्डे आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांसोबत माधुरीने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. आता गौतमी पाटील आणि शिव ठाकरे यांच्यासोबतही तिचा खेळकर अंदाज पाहायला मिळणार आहे. निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून आलेल्या गौतमीच्या मराठमोळ्या लूकचं माधुरी कौतुक करणार आहे. तर शिवच्या उपस्थितीमुळे या गप्पांमध्ये आणखी रंगत येणार आहे.
 
माधुरीची फर्माइश अन् गौतमीचा ठेका
या भागातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे माधुरी दीक्षितने गौतमी पाटीलकडे केलेली खास फर्माइश. गप्पा सुरू असताना माधुरी गौतमीला ‘पाटलांचा बैलगाडा’ या लोकप्रिय गाण्याची हुकस्टेप करून दाखवण्यास सांगणार आहे. माधुरीची इच्छा ऐकताच गौतमीही वेळ न घालवता हॉटसीटवर बसल्या-बसल्याच आपल्या खास शैलीत ठेका धरणार आहे.
गौतमीची ही हुकस्टेप पाहून माधुरी टाळ्या वाजवत तिचं कौतुक करणार आहे. दोघींमधील हा उत्स्फूर्त संवाद कार्यक्रमाची रंगत वाढवणारा ठरणार आहे. प्रश्नोत्तरांच्या खेळात नृत्याची अशी फोडणी मिळाल्याने प्रेक्षकांनाही मनोरंजनाचा वेगळा अनुभव घेता येणार आहे.माधुरीची फर्माइश आणि गौतमीचा खास नृत्याविष्कार यांची झलक सोशल मीडियावरही लक्ष वेधून घेत आहे. गौतमीच्या नृत्याची लोकप्रियता आणि माधुरीची त्याला मिळालेली दाद यामुळे या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता गौतमी आणि शिव ठाकरे माधुरीच्या प्रश्नांना कशी उत्तरं देणार, त्यांच्या गप्पांमधून कोणते मजेशीर किस्से समोर येणार आणि कार्यक्रमात आणखी कोणते मनोरंजक क्षण पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.