ठाणे
purnekar-death-case मानपाडा येथील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. तर दुसरीकडे पूर्णेकर कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी ठाण्यात सर्वपक्षीय आंदोलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून ठाण्यात आंदोलन करण्यात येत आहे.
या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी पूर्णेकर कुटुंबाकडून गेल्या महिन्याभरापासून करण्यात येत आहे. दरम्यान, आता मीनाक्षी शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप झाले होते.
हत्याकांडानंतर तब्बल 30 दिवसांनी मीनाक्षी शिंदे यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मिनाक्षी शिंदे या सध्या ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि नगरसेविका आहेत. मिनाक्षी शिंदेंकडे लाडकी सून पदाची देखील जबाबदारी आहे, मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देत या पत्रात त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.