धुळीच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेची विशेष मोहीम

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
मुंबई
mumbai bmc मुंबईतील वायुप्रदूषण कमी करून शहर धूळमुक्त करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या नऊ दिवसांच्या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, दुभाजक आणि धूळ साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार असून, यासाठी प्रत्येक प्रभागाला १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळीचे प्रमाण कमी करून प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
 

mumbai bmc launches 9-day dust control drive to curb air pollution; ₹15 lakh per ward 
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत मुंबईतील प्रमुख वाहतूक मार्गांसह धूळप्रवण रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर), बीकेसी कनेक्टर तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह अन्य महत्त्वाच्या रस्त्यांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

 
 
रोजच्या कामाचा आढावा; छायाचित्रांसह नोंद ठेवणार
मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळांच्या उपायुक्तांना प्रत्यक्ष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालन पथकाकडून मोहिमेच्या प्रगतीची मध्यवर्ती स्तरावर नोंद ठेवली जाणार आहे. कोणत्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली, त्यासाठी किती यंत्रसामग्री वापरली आणि किती कचरा व गाळ गोळा करण्यात आला, याची माहिती संकलित केली जाणार आहे.
याशिवाय, स्वच्छतेपूर्वी आणि स्वच्छतेनंतरची छायाचित्रे भौगोलिक स्थानाच्या नोंदीसह म्हणजेच जिओ-टॅगिंग करून जतन केली जाणार आहेत. मोहिमेच्या कामाची पडताळणी केलेली माहिती वेळोवेळी प्रसारमाध्यमांना देण्याचे निर्देशही जनसंपर्क अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मोहिमेची प्रगती आणि तिचे परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.या विशेष मोहिमेदरम्यान रस्त्यांवर साचलेली धूळ, गाळ तसेच बांधकाम आणि पाडकामातून निर्माण झालेला राडारोडा हटवण्यात येणार आहे. रस्त्यांचे दुभाजक, मधले पट्टे, पदपथ आणि रस्त्यांच्या कडांचीही स्वच्छता केली जाणार आहे. गरजेनुसार रस्त्यांवर पाणी शिंपडणे आणि मिस्टिंगच्या माध्यमातून धूळ नियंत्रणाचे उपाय राबवले जातील.
 
 
मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचे नियोजन
मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी आपापल्या सहाय्यक आयुक्तांशी समन्वय साधून दिवसनिहाय कृती आराखडा तयार करायचा आहे. या नियोजनाच्या आधारे स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दिवाळीच्या काळात मुंबईतील रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. आता या नऊ दिवसांच्या मोहिमेत प्रत्यक्षात किती धूळ हटवली जाते आणि प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा कितपत परिणाम दिसून येतो, याकडे लक्ष लागले आहे.