अनिल कांबळे
नागपूर,
nagpur bench महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिच्या तीन वर्षांच्या मुलाची हत्या करणारा नराधम संजू विश्वनाथ सरकार याची फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली असता त्यांनी निर्णय राखून ठेवला होता, हे विशेष.
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील एका खेड्यात राहणाऱ्या महिलेचा पती मोलमजुरीसाठी आंध्र प्रदेशात गेला होता. त्यामुळे शेजारी राहणारा आरोपी १९ जून २०१७ रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजता महिलेच्या घरात शिरला. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, महिलेने नकार दिला. त्यामुळे तो बळजबरी करायला लागला. महिलेने स्वत:चा बचाव करण्यासाठी झटापट केल्याने तिचा मुलगा झोपेतून जागा होऊन रडायला लागला. परिणामी, आरोपीने त्या निष्पाप मुलाला नाक व तोंड दाबून ठार मारले. तसेच, तो महिलेचा गळा चाकूने चिरून पळून गेला. ती महिला सकाळी उशिरापर्यंत घराच्या बाहेर दिसली नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घराच्या आत डोकावून पाहिले असता अंगावर काटा आणणारे दृश्य दिसले. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिचा मुलगा खाटेवर मृतावस्थेत होता. महिलेला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर तिने थरारक घटनाक्रम सांगितला.
जिल्हा न्यायालयाने ठोठावली होती फाशीची शिक्षा
२४ डिसेंबर २०२५ रोजी अहेरी nagpur bench जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला हत्येच्या गुन्ह्याकरिता फाशी, बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर हायकोर्टाने शिक्कामोर्तब करणे आवश्यक असते. त्यामुळे राज्य सरकारने हायकोर्टात प्रकरण दाखल केले होते. तसेच, आरोपीने अपील दाखल करून संपूर्ण शिक्षेला आव्हान दिले होते. हायकोर्टाने फाशीऐवजी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपीतर्फे ॲड. राजेंद्र डागा, तर राज्य सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.