दुष्काळाची झळ वन्यजीवांनाही

जंगलातील पाणवठे भरण्यासाठी वन विभागाची टँकरद्वारे व्यवस्था

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
लासलगाव
wildlife waterholes अपुऱ्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागली असून, शासनाने जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच पाणीटंचाईची चिन्हे दिसू लागल्याने ग्रामीण भागातील नैसर्गिक जलस्रोत आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा वन्यजीवांना फटका बसू नये आणि पाण्याच्या शोधात त्यांनी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ नये, यासाठी वन विभागाने जंगलातील कृत्रिम पाणवठे टँकरद्वारे भरण्यास सुरुवात केली आहे.
 
 
wildlife waterholes
पाण्याच्या शोधात वन्यजीव जंगलाबाहेर येण्याची शक्यता
दुष्काळामुळे नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडल्यास बिबटे, हरीण, ससे, मोर, कोल्हे, लांडगे यांसह अन्य वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. पाण्याच्या शोधात हे प्राणी मानवी वस्त्यांजवळ आल्यास मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढू शकतो. ही संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी उपलब्ध राहील, याची काळजी वन विभागाकडून घेतली जात आहे.
 
 
मालेगाव वनपरिक्षेत्रातील निंबायती येथे चार, कंक्राळे येथे दोन, दहीदी येथे दोन आणि पोहाणे येथे दोन कृत्रिम पाणवठे आहेत. या पाणवठ्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी भरले जात आहे. सटाणा वनपरिक्षेत्रातील विविध ठिकाणीही कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.चांदवड आणि वडनेरभैरव परिसरातील लोढाई माता डोंगर, धोंडबाई, गोहरण, परसूल, राजदरवाडी, दिघवद, कानडगाव, रायपूर, कुंदलगाव आणि एरंडगाव या भागांतील पाणवठ्यांमध्येही टँकरद्वारे पाणी भरले जात आहे.ज्या ठिकाणी कृत्रिम पाणवठे उपलब्ध नाहीत, अशा भागांत सिमेंटची भांडी, ड्रम आणि अन्य पात्रांमध्ये पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पाण्याची गरज असलेल्या वन्यजीवांना जंगल परिसरातच पाणी मिळण्यास मदत होऊ शकते.
 
 
हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत १८ नवीन पाणवठे
दुष्काळी परिस्थितीत वन्यजीवांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि बाऱ्हे परिसरात १८ नवीन पाणवठे तयार करण्यात आले आहेत. उपलब्ध पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी भरण्यासोबतच नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि अस्तित्वातील पाणवठ्यांमधील गाळ काढणेही महत्त्वाचे ठरणार आहे.दुष्काळाच्या काळात जंगलातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी नमूद केले आहे. वनक्षेत्रातच पाणी उपलब्ध झाल्यास वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे होणारी भटकंती कमी करण्यास आणि संभाव्य संघर्ष टाळण्यास मदत होऊ शकते.