रामकुंडावरील ऐतिहासिक ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज

पंचवटीतील ११ रस्ते १८ तास बंद, ७१ शाळांना सुट्टी

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
नाशिक
nashik ramkund नाशिकमधील रामकुंडावर ३१ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा पार पडणार असून, या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सोहळ्याला देशभरातून साधू-महंत, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुमारे १५ ते २० हजार भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने पंचवटी परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. यानुसार, पंचवटीतील ११ रस्ते सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
 
 

nashik ramkund flag hoisting ceremony on october 31: 11 roads closed, traffic restrictions announced 
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. मखमलाबाद नाका, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा आणि मेनरोड परिसरातील व्यावसायिकांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या निर्बंधांची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
 
 

वाहनांसाठी १० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शहरात १० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, पार्किंगच्या ठिकाणाहून रामकुंडापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना सुमारे २ ते ३ किलोमीटर पायी चालावे लागू शकते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा आणि वाहतूक व्यवस्थेबाबतच्या सूचनांची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे.
 
 

७१ शाळांना सुट्टी; गोदाघाटावरील दुकाने बंद
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागातील ७१ शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गोदाघाट परिसरातील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.रामकुंडावरील ध्वजारोहण सोहळ्यानंतर सायंकाळी महागोदा आरती होणार आहे. या कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनावर भर देण्यात येत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवली जात आहे. भाविकांनी सहकार्य करावे आणि गैरसोय टाळण्यासाठी आधीच प्रवासाचे नियोजन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.