वाशीम,
soybeans fire तालुक्यातील काटा येथील शेतकरी संतोष आनंदा बनसोड यांच्या शेतातील दोन एकरांतील सोयाबीन सुडीला (गंजीला) आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. २८ ऑटोबरच्या रात्री घडलेल्या या घटनेत कापणीनंतर सुडीत साठवून ठेवलेले संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले. या आगीत शेतकर्याचे अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्टता नसून परिसरात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
काटा येथील शेतकरी संतोष आनंदा बनसोड यांची गट क्रमांक ३१ मध्ये दोन एकर शेती आहे. त्यांनी या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. पीक काढणीनंतर सोयाबीनची सुडी शेतातच लावून ठेवली होती. मात्र, २८ ऑटोबरच्या रात्री अचानक सुडीला आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण सुडी जळून खाक झाली. त्यामुळे कष्टाने पिकविलेले सोयाबीन डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी बनसोड यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
दोन एकरांतून किमान १० ते १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आगीमुळे संपूर्ण उत्पादन हातचे गेले.soybeans fire आजच्या बाजारभावानुसार या नुकसानीची किंमत अंदाजे ७० ते ८० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीन विक्रीतून मिळणार्या उत्पन्नावर शेतीचा खर्च भागविण्याची अपेक्षा असताना, आगीच्या घटनेने त्यांच्या आर्थिक नियोजनाला मोठा फटका बसला आहे.
यंदा कमी पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने अनेक शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत कष्टाने पिकविलेले आणि कापणीनंतर साठवून ठेवलेले सोयाबीन जळून गेल्याने बनसोड कुटुंबासमोर उदरनिर्वाहासह आगामी शेती हंगामाच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्याला या नुकसानीतून सावरण्यासाठी प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.