वाराणसीत सपाची आघाडी कायम!

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
वाराणसी,
sp-maintains-its-lead-in-varanasi उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, वाराणसी पदवीधर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा यांनी आपली आघाडी कायम राखली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांच्या नऊ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. या टप्प्यातही सपाच्या उमेदवाराची आघाडी कायम असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
 
sp-maintains-its-lead-in-varanasi
 
उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी तिसऱ्या दिवशीही सुरू होती. उपलब्ध आकडेवारीनुसार, भाजपने सहा, तर समाजवादी पक्षाने चार जागांवर विजय मिळवला होता. उर्वरित एका जागेवर सपाचा उमेदवार आघाडीवर होता. वाराणसी पदवीधर मतदारसंघात आशुतोष सिन्हा यांनी भाजपचे उमेदवार केदारनाथ सिंह यांच्याविरुद्ध सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती.
 
पहिल्या पसंतीच्या मतांच्या नवव्या फेरीअखेर आशुतोष सिन्हा यांना ५० हजार ४६२ मते मिळाली होती, तर केदारनाथ सिंह यांच्या खात्यात ३३ हजार ४७२ मते जमा झाली होती. त्यामुळे सिन्हा यांनी १६ हजार ९९० मतांची आघाडी घेतली होती. पुढील आकडेवारीत सिन्हा यांना आणखी ६७ मते मिळाल्याने त्यांची एकूण मतसंख्या ५० हजार ५२९ झाली. दुसरीकडे, केदारनाथ सिंह यांना ५२ मते मिळाल्याने त्यांची मतसंख्या ३३ हजार ५३० वर पोहोचली.
 
या मतदारसंघात एकूण १ लाख ९ हजार ५२२ मते वैध ठरली होती. विजयासाठी ५४ हजार ७६२ मतांचा टप्पा गाठणे आवश्यक होते. पहिल्या पसंतीच्या मतांच्या आठव्या फेरीअखेर सिन्हा यांना ४७ हजार ४५०, तर सिंह यांना ३१ हजार १८९ मते मिळाली होती. त्यावेळी सिन्हा यांची आघाडी १६ हजार २६१ मतांची होती.
 
यापूर्वीच्या फेऱ्यांमध्येही सपाच्या उमेदवाराने आपले वर्चस्व कायम ठेवले होते. सहाव्या फेरीअखेर आशुतोष सिन्हा यांना ३५ हजार ८६ मते मिळाली होती, तर भाजपचे केदारनाथ सिंह यांना २३ हजार २५३ मते मिळाली होती. त्यामुळे सिन्हा ११ हजार ८३३ मतांनी पुढे होते. पाचव्या फेरीअखेर सिन्हा यांना २८ हजार ८६३, तर सिंह यांना १९ हजार ३७३ मते मिळाली होती. त्यावेळी दोन्ही उमेदवारांमधील मतांचे अंतर ९ हजार ४९० होते.
 
मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण १४ काउंटर उभारण्यात आले होते. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी प्रत्येकी एक हजार मतांच्या गटांमध्ये करण्यात आली. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असतानाही सपाच्या उमेदवाराची आघाडी कायम राहिल्याने कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रापासून दूर जल्लोष केला. दरम्यान, भाजपचे उमेदवार केदारनाथ सिंह यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया मंचावर पोस्ट करत मतदारांचे आभार मानले. निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी मतदारांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले.
 
उत्तर प्रदेशातील अन्य विधान परिषद मतदारसंघांचे निकालही समोर आले. समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी वाराणसी विभागीय शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला. भाजपचे दिनेश कुमार गोयल यांनी मेरठ पदवीधर मतदारसंघ, उमेश द्विवेदी यांनी लखनौ शिक्षक मतदारसंघ, डॉ. मानवेंद्र प्रताप सिंह यांनी आग्रा पदवीधर मतदारसंघ, श्रीचंद शर्मा यांनी मेरठ शिक्षक मतदारसंघ आणि डॉ. हरी सिंह ढिल्लन यांनी बरेली-मोरादाबाद शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला. तसेच समाजवादी पक्षाचे डॉ. आकाश अग्रवाल यांनी आग्रा शिक्षक मतदारसंघ, तर डॉ. मान सिंह यादव यांनी अलाहाबाद-झांसी पदवीधर मतदारसंघात बाजी मारली.