नवी दिल्ली,
rahul-gandhis-appeal-to-the-public लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी तसेच कथित मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘चलो दिल्ली’ मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. गुरुवारी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
राहुल गांधी यांनी हा मोर्चा केवळ काँग्रेस किंवा कोणत्याही एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसल्याचे सांगितले. लोकशाही वाचवणे, कथित मतचोरीला विरोध करणे आणि संविधानाचे रक्षण करणे, हा या आंदोलनामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकांवर नाराजी असलेल्या नागरिकांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘पोलीस आणि लाठीचार्जची चिंता करू नका’
मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पोलीस कारवाई किंवा लाठीचार्जच्या शक्यतेने घाबरू नये, असे राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले. भारतीय जनता पक्ष अशा प्रकारची कारवाई करण्याचे धाडस करणार नाही, असा दावाही त्यांनी केला. संविधान आणि देशाच्या रक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थी संघटनांनाही सहभागी होण्याचे आवाहन
राहुल गांधी यांनी सर्व विद्यार्थी संघटनांना राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे वाटणाऱ्या तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मत आणि विचारांना लक्ष्य केले जात असल्याची भावना असलेल्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. हा मोर्चा देशाच्या आत्म्याच्या रक्षणासाठी असल्याचे सांगत त्यांनी १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर नागरिकांची भेट घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, एका कामगार संघटनेने राहुल गांधी यांना पत्र लिहून प्रस्तावित मोर्चा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून १ नोव्हेंबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.