मालेगावच्या जुन्या बसस्थानकावर एक किलो गांजासह युवक ताब्यात

गांजा व मोबाईलसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :29-Oct-2026
Total Views |
मालेगाव,
ganja malegaons मालेगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात पोलिसांनी कारवाई करून गांजासदृश्य मादक पदार्थासह एका युवकाला ताब्यात घेतले. शेख असलम शेख हारुण वय २४, राहणार शिरपूर, ता. मालेगाव, जि. वाशीम असे या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून १ किलो ६० ग्रॅम गांजा पदार्थ आणि एक मोबाईल फोन असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 

ganja malegaons 
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालेगांव चे ठाणेदार राजेश खेरडे यांना २८ ऑटोबर रोजी रात्री गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहरातील जुन्या बसस्थानकावर एक व्यक्ती गांजा घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकार्‍यांना अवगत करून आवश्यक परवानगी घेण्यात आली. त्यानंतर पंच, वजनकाटामापक आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या मदतीने कारवाईची तयारी करण्यात आली. या कारवाईसाठी मालेगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अरविंद करांगळे यांनाही राजपत्रित अधिकारी म्हणून पाचारण करण्यात आले.पोलिस पथकाने रात्री सुमारे ८.५८ वाजता स्टेशन डायरीमध्ये नोंद करून जुन्या बसस्थानकाकडे धाव घेतली. घटनास्थळी अंधारात एक युवक संशयास्पदरीत्या बसलेला दिसून आला. पंच आणि नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख असलम शेख हारुण असे सांगितले.त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिवळ्या रंगाच्या पिशवीत खाकी रंगाचे एक पाकीट आढळून आले. या पाकिटात गांजासदृश वनस्पती आढळली. तिचे प्राथमिक वजन १ किलो ६० ग्रॅम भरले.
पोलिसांच्या अहवालानुसार, या वनस्पतीमध्ये कॅनाबिससदृश पाने, फुले आणि बोंडे होती. पोलिसांनी घटनास्थळी नमुना वेगळा काढून उर्वरित मुद्देमाल पॅक करून सीलबंद केला.ganja malegaons याशिवाय आरोपीच्या खिशातून ओप्पो कंपनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. पोलिसांनी गांजासदृश वनस्पतीची किंमत ५० हजार रुपये, तर मोबाईल फोनची किंमत १५ हजार रुपये अशी निश्चित केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अर्थात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी) आणि २० अन्वये कारवाई करण्यात आली.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलिस कर्मचारी शिवाजी काळे, जयशंकर पाटील, मनोज चुंबळकर, दामोधर लठाड आणि गणेश मेटांगळे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांचा समावेश होता.