धाबा शेतशिवारात वाघीणीच्या ‘पगमार्क’ने खळबळ

पिल्लांसह वावर असल्याच्या चर्चेने शेतकर्‍यांमध्ये दहशत

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
गोंडपिपरी,
pug-mark धाबा शेतशिवारात वाघिणीच्या पावलांचे ठसे (पगमार्क) आढळून आल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. स्थानिक शेतकरी मिथलेश्वर झाडे यांच्या शेतापर्यंत ही वाघीण तिच्या पिल्लांसह (बछड्यांसह) येत असल्याचे समोर आले असून, शेतातील हे पगमार्क कॅमेर्‍यातही कैद करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसर आणि लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
pug-mark
 
धाबा शेतशिवारातील जंगलाला लागून असलेल्या भागात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान, मिथलेश्वर झाडे यांच्या शेत परिसरात वाघाच्या पावलांसारखे मोठे ठसे गावकर्‍यांना दिसून आले. अनिल डोंगरे यांनी सतर्कता दाखवत हे पगमार्क आपल्या कॅमेर्‍यात कैद केले. हे ठसे एका वाघिणीचे आणि तिच्यासोबत असलेल्या पिल्लांचे असावेत, अशी जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. मात्र, या पगमार्कची अधिकृत ओळख वनविभागाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आणि तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. वनविभागाने या पगमार्कची तात्काळ पडताळणी करून या भागात वन कर्मचार्‍यांची गस्त वाढवावी. तसेच, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतशिवारात तात्काळ कॅमेरा ट्रॅप लावावेत, अशी मागणी धाबा परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.