मुंबई
cjp protest मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सुमारे ५०० आंदोलकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही मोठ्या संख्येने आंदोलक शिवाजी पार्क परिसरात जमले होते.
गांधी जयंतीच्या दिवशी दुपारनंतर शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. देशाच्या विविध भागांतून तरुण या आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनाला काही कलाकारांनीही उपस्थिती लावली होती. पोलिसांची परवानगी नसल्याने आंदोलन होणार की नाही, याबाबत सुरुवातीपासूनच अनिश्चितता होती. मात्र, परवानगी नाकारल्यानंतरही दिपके आंदोलनावर ठाम राहिले आणि अखेर शिवाजी पार्क परिसरात सभा घेण्यात आली.
या आंदोलनाला शिवाजी पार्क परिसरातील काही स्थानिकांनी विरोध केला होता. दिपके यांनी या विरोधामागे स्थानिक रहिवासी नसून भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतरही त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. सभेत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र आणि राज्य सरकारवरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही त्यांनी भाष्य केले.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. वकील सिद्धी देवळेकर यांनी परवानगीशिवाय आंदोलन केल्यामुळे परिसरातील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम झाल्याचा आरोप करत तक्रार दिली होती. शिवाजी पार्कमधील कार्यक्रमांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१३ मधील निर्णयाचा संदर्भही त्यांनी तक्रारीत दिल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही सभा आणि घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.आता या प्रकरणात पोलिसांनी अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, सौरभ दास, आफरीन नवाज, सोम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी आणि योगेश इंगळे यांच्यासह सुमारे ५०० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परवानगी नसताना जमाव जमवून सभा घेणे, घोषणाबाजी करणे तसेच सार्वजनिक रस्त्यावर ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १८९(२) आणि २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोलिसांकडून सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, आंदोलनाला परवानगी नसतानाही ते आयोजित करण्यात आल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आता या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे. आंदोलनादरम्यान नेमक्या कोणत्या व्यक्तींची भूमिका होती आणि पुढील तपासात आणखी कोणावर कारवाई केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.