अमरावती,
Amaravati Youth Festival 2026अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सव २०२६ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत चार पारितोषिके प्राप्त केली. महाविद्यालयाच्या ‘अभिमंच’ ड्रामा क्लबच्या विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके मिळवून महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला. हास्य प्रहसन या कलाप्रकारात ओम पुरोहित, आरुषी सूर्यवंशी, वेदांत चवरे, पायल इंगळे, अद्वैत पिंपळगावकर व श्रावणी सूर्यकर यांच्या सादरीकरणाला प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच ‘पडदा’ या एकांकिकेला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. यामध्ये श्रावणी सूर्यकर, श्रुती देशमुख व आरुषी सूर्यवंशी यांनी अभिनय केला, तर पूर्वा बोबडे, आयुष अहेर, परीक्षित खेकडे, प्रवीण भोसले व माधुर्य ठाकरे यांनी पार्श्वमंचाची जबाबदारी सांभाळली.
मिमिक्री या कलाप्रकारात अद्वैत पिंपळगावकर याने आपल्या प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर तृतीय पारितोषिक पटकावले. यासोबतच व्यंगचित्र या कलाप्रकारात महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष नवघरे यानेही तृतीय पारितोषिक मिळवून महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. अशा प्रकारे नाट्यकला, अभिनय, विनोदी सादरीकरण आणि चित्रकला या विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता, कलात्मक दृष्टी आणि सादरीकरण कौशल्य सिद्ध केले.
अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक शिक्षणासोबतच सांस्कृतिक व कलात्मक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी संपादन केलेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, सहकारी विद्यार्थी आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.