होर्मुजमध्ये कुवैती टँकरवर हल्ला, ५ भारतीय नाविक बचावले
दिनांक :03-Oct-2026
Total Views |
कुवैत,
Attack on Kuwaiti tanker in Hormuz होर्मुज सामुद्रधुनीत कुवैतच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या क्रूड ऑइल टँकरला प्रोजेक्टाइलने लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. या टँकरवर असलेल्या पाच भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे तटावर आणण्यात आले आहे. ओमानमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी या बचावकार्याची माहिती दिली. भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ओमानी अधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण बचाव मोहिमेचे समन्वय करण्यात आले.भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, MT Kazimah III या टँकरवर होर्मुज सामुद्रधुनीत प्रोजेक्टाइलने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर टँकरवरील पाच भारतीय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बचावकार्यादरम्यान सहकार्य केल्याबद्दल भारतीय दूतावासाने ओमानी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
MT Kazimah III हा क्रूड ऑइल टँकर असून सध्या तो कुवैतच्या ध्वजाखाली कार्यरत आहे. हा टँकर टोगोमधील लोमे बंदराच्या दिशेने रवाना झाला होता. टँकरला प्रोजेक्टाइलचा फटका बसल्यानंतर त्यावरील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर भारतीय मिशनने तातडीने बचावकार्याशी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला.या घटनेच्या पार्श्वभूमीवर आखातातील भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भारताकडून फारसच्या आखातासह आसपासच्या समुद्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिक जहाजांवर असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील विविध व्यावसायिक जहाजांवर ४,५०० हून अधिक भारतीय नाविक कार्यरत आहेत. त्यापैकी १२ सक्रिय कार्गो जहाजांवर सुमारे १६३ भारतीय नाविक आहेत.जायसवाल यांच्या माहितीनुसार, फारसच्या आखातात सध्या भारताच्या ध्वजाखाली कार्यरत असलेली सहा व्यावसायिक जहाजे आहेत. याशिवाय भारतासाठी मालवाहतूक करणारी विदेशी ध्वजाखालील सहा जहाजेही या भागात आहेत. अशा एकूण १२ जहाजांवर सुमारे १६३ भारतीय नाविक कार्यरत आहेत.