औंढा नागनाथ मंदिर महिनाभर भाविकांसाठी बंद

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
हिंगोली
aumdha nagnath temple महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग मानले जाणारे श्री औंढा नागनाथ मंदिर पुढील महिनाभर सामान्य भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिरातील प्राचीन वास्तूच्या दुरुस्ती आणि संवर्धनाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांनी या कालावधीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

aumdha nagnath temple closedc 
औंढा नागनाथ मंदिराच्या गर्भगृहातील भिंती, दगडी खांब आणि प्राचीन वास्तूच्या स्वच्छता व संवर्धनाचे काम ५ ऑक्टोबरपासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. मंदिराच्या प्राचीन वास्तूवर अनेक वर्षांपासून साचलेले तेल, कुंकू, हळद तसेच पूजाविधीत वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्याचे थर या प्रक्रियेत काढण्यात येणार आहेत.प्राचीन दगडी वास्तूचे मूळ स्वरूप अबाधित राहावे आणि संवर्धनाच्या प्रक्रियेत कोणत्याही भागाचे नुकसान होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक रासायनिक प्रक्रियेचा वापर करून वास्तूची स्वच्छता आणि संवर्धन केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी भगवान नागनाथांची नित्य पूजा मात्र सुरू राहणार आहे. सकाळची आणि दुपारची नियमित पूजा पूर्वीप्रमाणेच करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती लक्षात घेऊनच नियोजन करावे.