लॉजमध्ये आढळला सातारा वाहतूक पोलिसाचा मृतदेह

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
सातारा,
Body of a Satara traffic police officer सातारा जिल्हा पोलीस दलात वाहतूक पोलिस म्हणून कार्यरत असलेल्या संतोष रामचंद्र ननावरे (वय ३६, रा. ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा) यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. चार दिवसांपासून ते बेपत्ता होते. अखेर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत काळकाई हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतून कौटुंबिक वाद आणि पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
 
 
 
354567
 
संतोष ननावरे हे चार दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. शुक्रवारी सकाळी लॉजमधील कर्मचारी त्यांना आंघोळीचे पाणी देण्यासाठी त्यांच्या खोलीजवळ गेला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खिडकीच्या काचेतून पाहिले असता ननावरे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांचे उपनिरीक्षक सतीश पवार, महाडचे डीवायएसपी प्रदीप काळे आणि पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाइकांच्या उपस्थितीत खोलीचा दरवाजा उघडून मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. वाई तालुक्यातील ओझर्डे या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातच दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून १९ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणानेही खळबळ उडवली होती. हर्षदा नावाच्या तरुणीचा तिच्या वडिलांनी आणि चुलत्याने नाक व तोंड दाबून खून केल्याचा आरोप आहे. मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हर्षदाच्या वडिलांसह चुलत्यालाही अटक केली आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदाला लहानपणापासून मित्र-मैत्रिणींसोबत राहण्याची आवड होती. तिच्या वागण्यावरून कुटुंबात अनेकदा वाद होत असल्याचे सांगण्यात आले आहे. हर्षदा पुण्यात शिक्षण घेत होती. ती दररोज सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडत असे आणि रात्री ८ वाजता घरी परतत असे. तिच्या या दिनक्रमावरून वडील आणि मुलीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांकडून पैसे देण्यास नकार मिळाल्यानंतर हर्षदा घर सोडून जाण्याची धमकी देत असल्याचेही सांगण्यात आले आहे. या सततच्या कौटुंबिक वादातून तिच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिचे वागणे थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. या दोन्ही घटनांमुळे सातारा जिल्ह्यात कौटुंबिक वाद आणि त्यातून घडणाऱ्या गंभीर घटनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.