अभियंत्याचा ‘लाचकांड' एनओसी साठी ‘रेट’ ठरला

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
मुंबई
cbi bribery case वडाळा येथील एका गृहनिर्माण प्रकल्पासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याच्या मोबदल्यात एक कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातील (CPWD) कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत अभियंत्याचा नातेवाईक, एका रिअल इस्टेट समूहाचा उपाध्यक्ष, व्यवस्थापक आणि संबंधित फर्मचा भागीदार यांचा समावेश आहे.
 

cbi bribery case 
वडाळा परिसरातील एका भूखंडावर रिअल इस्टेट समूहाला गृहनिर्माण प्रकल्प उभारायचा होता. या जमिनीवर CPWDचा कोणताही हक्क किंवा दावा नसल्याचे स्पष्ट करणारे ना हरकत प्रमाणपत्र प्रकल्पासाठी आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंत्याने आपल्या नातेवाईकामार्फत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चर्चेतून लाचेची रक्कम ७० लाख रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे CBIच्या कारवाईत समोर आले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर CBIने गुरुवारी गुन्हा दाखल करून सापळा रचला. कार्यकारी अभियंत्याच्या वतीने रिअल इस्टेट समूहाच्या उपाध्यक्षाकडून ५० लाख रुपये स्वीकारताना अभियंत्याच्या नातेवाईकाला पकडण्यात आले. त्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या कार्यकारी अभियंत्यालाही नवी मुंबईतील वाशी येथे ताब्यात घेण्यात आले.
या व्यवहाराच्या वेळी उपस्थित असलेल्या रिअल इस्टेट समूहाच्या व्यवस्थापकासह संबंधित ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या फर्मच्या भागीदारालाही CBIने अटक केली. अशा प्रकारे या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून, ५० लाख रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली आहे.
CBIच्या तपासानुसार, ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात पत्रव्यवहार नोंदवहीत कोणतीही नोंद न करता संबंधित ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. उर्वरित २० लाख रुपये एका आठवड्यानंतर देण्याचे ठरल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, CBIने कार्यकारी अभियंत्याशी संबंधित मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील घरे तसेच कार्यालयांवरही झडती घेतली. या कारवाईत ५० लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेशिवाय आणखी सुमारे ५३ लाख ८७ हजार रुपयांची रोकड, स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाचे दस्तऐवज हस्तगत करण्यात आले.
लाच स्वीकारणाऱ्या cbi bribery case  व्यक्तींबरोबरच लाच देणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात आल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही CPWDच्या नवी दिल्लीतील कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आणि एका खासगी व्यक्तीला कंत्राटदाराकडून सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. त्या कारवाईत ५५ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली होती.