नवी दिल्ली,
Demand for BrahMos missiles ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या आकाश आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची मागणी झपाट्याने वाढत आहे. एकूण निर्यात ६०० दशलक्ष डॉलर्सचा (५७.७८ अब्ज रुपये) टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनामसह तीन आग्नेय आशियाई देशांना ही अत्याधुनिक प्रणाली विकण्यासाठी करार आणि सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी दिली.

ब्रह्मोसची हवाई-प्रक्षेपित आवृत्ती देखील अस्तित्वात आहे आणि सुखोई लढाऊ विमानांवरील त्याची चाचणी यशस्वी ठरली आहे. निर्यात करण्यात यशस्वी ठरलेल्या सर्वात प्रगत सामरिक प्रणालींपैकी ब्रह्मोस ही एक असल्याचे सिंह यांनी वृत्तसंस्थेला मुलाखतीत सांगितले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ब्रह्मोस प्रणालीची लढाऊ क्षमता सिद्ध झाली. अर्मेनिया पहिला ग्राहक बनल्यानंतर मध्य आशियातही भारतीय आकाश क्षेपणास्त्राची मागणी वाढली आहे. संपूर्णपणे भारतात विकसित आणि उत्पादित केलेल्या या कमी पल्ल्याच्या प्राणघातक क्षेपणास्त्र प्रणालीची निर्यात ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला सुरू झाली आहे. देशांतर्गत सशस्त्र दलांकडून मिळालेल्या मोठ्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या क्षेपणास्त्राची मागणी वेगाने वाढली आहे. अर्मेनियाने २०२२ मध्ये भारताकडून हे क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी प्रथम करार केला होता आणि आता ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानलाही आकाशची निर्यात सुरू झाली आहे.