मुंबई
dharashiv farmer suicide धाराशिव जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे खानापूर येथील अल्पभूधारक शेतकरी दयानंद संताराम राठोड यांनी गुरुवारी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आंदोलन केले. राठोड यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
खानापूर (ता. धाराशिव) येथील दयानंद राठोड हे अल्पभूधारक शेतकरी असून ऊसतोड कामगार म्हणूनही काम करत होते. यंदा पावसाची अनियमितता आणि प्रतिकूल हवामानाचा फटका त्यांच्या शेतीला बसला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कर्जाची परतफेड यांचा आर्थिक ताण वाढल्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सांगितले.
साखर कारखान्याशी संबंधित देणी तसेच इतर कर्जाचा बोजा वाढल्याने राठोड आर्थिक अडचणीत होते, अशी माहिती समोर आली आहे. गुरुवारी शेतातील पिकांची दुरवस्था पाहून घरी परतल्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे खानापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी खानापूर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. राठोड यांचा मृतदेह घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी, तसेच प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
राठोड यांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देण्यात यावी आणि कुटुंबातील सुशिक्षित सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तातडीने पंचनामा करून अहवाल शासनाकडे सादर करावा, अशीही मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली.
मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. शासनाकडून मदतीबाबत लेखी आश्वासन आणि ठोस कार्यवाहीचे आश्वासन मिळावे, अशी त्यांची मागणी होती. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यातील पावसाची अनिश्चितता, नापिकी आणि शेतीशी संबंधित आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.