पॅरिस,
france-student-protest-school-crisisशाळेतील सुविधांची दयनीय स्थिती, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि अर्थसंकल्पीय कपातीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शाळेच्या परिसरात जाळपोळ आणि तोडफोडीच्या प्रकारानंतर पोलिसांशी झालेल्या संघर्षात २५० विद्यार्थी जखमी झाले. संतप्त विद्यार्थ्यांनी ४०० हून अधिक शाळांना टाळे ठोकले. आंदोलनाला नियंत्रत करताना ६५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. सरकारने पालकांना आपल्या मुलांना आंदोलनापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

फ्रान्समध्ये शाळांमधील खराब परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा संताप वाढला आहे. विद्यार्थी निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. शुक्रवारी, अनेक ठिकाणी शाळांची प्रवेशद्वारे बंद करण्यात आली, काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि विद्यार्थ्यांचा पोलिसांशी संघर्षही झाला. गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये सुरू झालेले हे आंदोलन आता देशाच्या इतर भागांमध्ये पसरले आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, शाळेच्या वेळा खूप जास्त आहेत आणि वर्गांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. अनेक वर्गखोल्या अत्यंत गरम आहेत. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शिक्षणावरही परिणाम होत आहे. शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात कपात करण्यात आल्याने सरकारविरोधात रोष असल्याचे निदर्शकांचे म्हणणे आहे. शिक्षण मंत्री एडवर्ड गेफ्रे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आंदोलकांसोबत चर्चा करण्यास सरकार तयार आहे. त्यांनी हिंसेपासून दूर राहावे, आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या असून, ऑनलाइन वर्ग घेण्याचा आदेश देण्यात आला.
शिक्षकांवरही हल्ले
निदर्शकांनी शाळेत प्रवेश करत शिक्षकांवरही हल्ले केले, यात ४० मुख्याध्यापक जखमी झाले. न्यायमंत्री जेराल्ड डार्मानिन यांनी सांगितले की, आंदोलन सुरू झाल्यापासून पोलिसांनी २,००० लोकांना ताब्यात घेतले आहे, त्यापैकी ९० टक्के अल्पवयीन आहेत. नुकसानीसाठी पालकांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्याकडून नुकसानीचा खर्च वसूल केला जाईल.
सरकारविरोधात रोष का वाढला?
विद्यार्थ्यांनी पोलिसांवर अतिरिक्त बळाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. पोलिस अश्रुधूराचा वापर करत आहे, त्यामुळे विद्यार्थी जखमी झाले. यामुळे आंदोलक संतप्त झाले आणि हिंसक वळण लागले. सरकारने विद्यार्थ्यांच्या तक्रारी रास्त असल्याचे मान्य केले आहे. तथापि, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावर सरकारने टीका केली आहे. शिक्षणमंत्र्यांचा आरोप आहे की, काही हिंसक गटांनी विद्यार्थी चळवळीवर ताबा मिळवला आहे.