एक नंबर! गणपती बाप्पा पावला बचत गटाची कमाल

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
अलिबाग
ganesh idol business रायगड जिल्ह्यातील महिला बचत गटांनी यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती निर्मिती आणि विक्रीच्या माध्यमातून तब्बल १५ कोटी ७४ लाख ५० हजार रुपयांची उलाढाल केली आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून मिळालेले प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ आणि व्यवसायासाठी उपलब्ध करून दिलेला निधी यामुळे जिल्ह्यातील महिलांना या पारंपरिक व्यवसायातून रोजगाराची संधी मिळाली आहे. यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ६१२ गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आणि गणेशोत्सवादरम्यान त्यांची विक्री करण्यात आली.
 

ganesh-idol-business-raigad-women-self-help-groups-15-74-crore-turnover 
रायगडमधील पेण तालुका गणेशमूर्ती निर्मितीसाठी विशेष ओळखला जातो. पेणमध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना देशातील विविध भागांसह परदेशातही मागणी आहे. मूर्तींची सुबक रचना, प्रमाणबद्ध बैठक, आकर्षक कोरीवकाम, रेखीव डोळे आणि उठावदार रंगकाम यामुळे पेणच्या मूर्तींनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. या व्यवसायातील रोजगाराची संधी लक्षात घेऊन पेणसह रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील महिला बचत गटांनाही या व्यवसायात सहभागी करून घेण्यात आले.
महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी ‘उमेद’ अभियानामार्फत बचत गटांना फिरता निधी देण्यात आला. त्याचबरोबर ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांच्या माध्यमातून पतपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या आर्थिक आणि प्रशिक्षणात्मक मदतीमुळे गणेशमूर्ती व्यवसायाला चालना मिळाली. परिणामी महिलांना त्यांच्या परिसरातच रोजगाराचे साधन उपलब्ध झाले असून, ganesh idol business  त्यातून आर्थिक स्वावलंबनाला हातभार लागला आहे. यंदाच्या विक्रीत पेण तालुक्याचा वाटा सर्वाधिक राहिला. पेणमध्ये सुमारे १ लाख ४९ हजार गणेशमूर्तींची विक्री झाली असून, त्यातून १४ कोटी २७ लाख रुपयांची उलाढाल झाली. माणगावमध्ये २ हजार १२५ मूर्तींच्या विक्रीतून ३४ लाख ७५ हजार रुपये, मुरुडमध्ये २ हजार ६० मूर्तींतून ३३ लाख ६५ हजार रुपये, खालापूरमध्ये ९५० मूर्तींतून १९ लाख ७५ हजार रुपये आणि कर्जतमध्ये ६१४ मूर्तींच्या विक्रीतून १३ लाख ४३ हजार रुपयांची उलाढाल झाली.
अलिबाग तालुक्यात ३२८ मूर्तींची विक्री होऊन ७ लाख ८१ हजार रुपयांची उलाढाल झाली, तर महाडमध्ये ७० मूर्तींच्या विक्रीतून १ लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूणच गणेशमूर्ती निर्मिती आणि विक्रीच्या माध्यमातून रायगडमधील महिला बचत गटांच्या आर्थिक उपक्रमाला यंदा मोठी चालना मिळाली आहे.