गडचिरोली,
gondwana-university शिक्षण आणि कौशल्याची योग्य सांगड घालून समाजाभिमुख विद्यार्थी घडवणारे गोंडवाना विद्यापीठाचे नवोउपक्रम निश्चितच दिशादर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाचा शाश्वत व संतुलित विकास साधणारे गोंडवाना विद्यापीठ हे भविष्यात एक नवे मॉडेल म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाचे समाजाप्रती असलेले उत्तरदायित्त्व स्पष्ट केले. जिल्ह्यातील स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्याचे काम विद्यापीठ करत असून स्पर्धा परीक्षा केंद्र, स्पार्क आणि स्कूल कनेक्ट यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थी थेट समाजाशी जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर विशेष अतिथी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कौशल्ययुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण, मजबूत अर्थव्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल असे नमूद केले.
सोहळ्यात विद्यापीठाचा मानाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ डॉ. शिवनाथ कुंभारे यांना मरणोपरांत प्रदान करण्यात आला, जो त्यांच्या पत्नी सुमन कुंभारे यांनी स्वीकारला. तसेच डॉ. राजन जयस्वाल यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. जयस्वाल यांनी औदार्य दाखवत पुरस्काराची रक्कम विद्यापीठाच्या गरीब विद्यार्थी निधीला दान केली. याच कार्यक्रमात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल विशाल मेश्राम या आदिवासी तरुणाचा विशेष सत्कार करण्यात आला.
याव्यतिरिक्त शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या गुणवंतांना ‘विद्यापीठ पुरस्कार-2026’ प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. एस. बी. किशोर (उत्कृष्ट नॅशनल अचिव्हर्स), डॉ. शीला नरवाडे (उत्कृष्ट अधिसभा सदस्य), महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर (उत्कृष्ट महाविद्यालय), डॉ. कुलदीप राजकिशोर गौड (उत्कृष्ट शारीरिक शिक्षण निर्देशक), डॉ. रामदास राजाराम कामडी (उत्कृष्ट शिक्षक), डॉ. मोहन एथकंठीवार (उत्कृष्ट ग्रंथपाल), कृष्णा देविकर (वर्ग-2), शैलेश येसेंकर (वर्ग-3), संजय बुरांडे (वर्ग-4) आणि मयूर बुरांडे (उत्कृष्ट विद्यार्थी) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला मानव्य विज्ञान अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. नीन मुंगळे, विविध प्राधिकरणांचे सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.