नवी दिल्ली,
Hindu rites does not make one a Hindu हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहाची नोंदणी करण्यासाठी केवळ हिंदू रितीरिवाज आणि धार्मिक विधींनुसार लग्न करणे म्हणजे संबंधित व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारला आहे किंवा ती व्यक्ती हिंदू आहे हे सिद्ध होत नाही. हिंदू विवाह कायद्याअंतर्गत विवाह वैध ठरण्यासाठी तो हिंदू विधीनुसार आणि दोन्ही व्यक्ती हिंदू असतानाच संपन्न होणे आवश्यक आहे, असे नमूद करत दिल्ली उच्च न्यायालयाने नागरिकत्वाच्या अटीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.
नियमांनुसार हिंदू विवाह कायद्याखाली विवाहाची नोंदणी करण्यासाठी पती किंवा पत्नीपैकी किमान एक जण भारतीय नागरिक आणि संबंधित विवाह अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या नियमाला आणि २०१४ च्या विवाह नोंदणी आदेशातील नागरिकत्वाच्या अटीला एका स्वीडिश नागरिक असलेल्या महिलेने आव्हान देत याचिका दाखल केली होती. यावर मुख्य न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. याचिकाकर्त्या स्वीडिश महिलेने मार्च महिन्यात एका स्वीडिश पुरुषाशी विवाह केला होता. तिच्या पतीने लग्नापूर्वी आर्य समाज मंदिरात हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. विवाहानंतर आर्य समाज मंदिराने त्यांना विवाह प्रमाणपत्रही दिले होते. यानंतर महिलेने हिंदू विवाह कायद्यांतर्गत ऑनलाईन विवाह नोंदणीसाठी अर्ज केला. परंतु, दोघांपैकी एकही जण भारतीय नागरिक नसल्याने नोंदणी अर्ज स्वीकारला गेला नाही. त्यानंतर महिलेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र खंडपीठाने महिलेच्या वकिलाचा युक्तिवाद अमान्य करत याचिका फेटाळून लावली.
नोंदणी पोर्टलमध्ये सुधारणा करण्याचा निर्देश
खंडपीठाने म्हटले की, धर्मांतराचा कोणताही स्वतंत्र आणि ठोस पुरावा नसताना, केवळ हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह पार पडला याचा अर्थ याचिकाकर्त्याचे पती हिंदू विवाह कायद्यातील कलम २ च्या अर्थानुसार हिंदू होते, असे सिद्ध होत नाही. हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह तेव्हाच वैध ठरतो जेव्हा तो हिंदू कायद्यानुसार विहित केलेल्या आवश्यक विधींनुसार दोन हिंदूंमध्ये पार पडतो. यावेळी खंडपीठाने दिल्ली सरकारला ऑनलाईन विवाह नोंदणी पोर्टलमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा निर्देश दिला.