बुलढाणा
indian-football-team चिखली तालुयातील केळवद येथील युवा फुटबॉलपटू अर्णव राजेंद्र पांढरे याने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय फुटबॉलमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. म्यानमारविरुद्ध ४ आणि ७ ऑटोबर रोजी होणार्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी भारतीय अंडर-१७ पुरुष फुटबॉल संघात त्याची गोलरक्षक म्हणून निवड झाली आहे.

अर्णवच्या या निवडीमुळे केवळ केळवद गावाचाच नव्हे, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. अर्णवने वयाच्या अवघ्या नवव्या वर्गात शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा सिद्ध केली आहे. अंडर-१४ गटातील त्याची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन रिलायन्स फाउंडेशनने त्याची निवड केली होती. त्याचबरोबर त्याला शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही प्रदान करण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत अर्णवने फुटबॉलमधील आपला सराव आणि कौशल्य अधिक विकसित केले. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि मैदानावरील प्रभावी कामगिरीच्या बळावर त्याने भारतीय अंडर-१७ संघात स्थान मिळविण्याचा टप्पा गाठला आहे. अर्णवचे वडील राजेंद्र रामराव पांढरे हे अभियंता असून गुजरात येथे कार्यरत आहेत. अर्णवने फुटबॉल क्षेत्रात घेतलेली झेप कौतुकास्पद ठरत आहे.