भारताचा हॉकीत ‘सुवर्ण पंच’!

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
हांगझोऊ,
indias-golden-five-in-hockey आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत मलेशियाचा ५-१ असा पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी प्रथमच केली आहे. भारताच्या या यशामुळे २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील स्थानही निश्चित झाले आहे.
 
indias-golden-five-in-hockey
 
सामन्याच्या सुरुवातीपासून भारताने मलेशियावर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली. प्रारंभी भारतीय खेळाडूंनी सावध भूमिका घेतल्यानंतर आक्रमक खेळावर भर दिला. भारताला मिळालेला पहिला पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये बदलता आला नाही. मात्र, त्यानंतर मिळालेल्या दुसऱ्या संधीचा फायदा घेत कर्णधार हरमनप्रीत सिंगने ११व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मलेशियानेही जोरदार प्रत्युत्तर देत तीन मिनिटांत शेलो सिल्व्हेरियसच्या मैदानी गोलच्या मदतीने बरोबरी साधली.
 
दुसऱ्या सत्रात मलेशियाने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने बचावाची भक्कम भिंत उभी करत मलेशियाला मोठी संधी दिली नाही. २३व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि जुगराज सिंगने तो गोलमध्ये रूपांतरित करत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत भारताने २-१ अशी आघाडी कायम राखली.
 
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमणाची धार आणखी वाढवली. जुगराज, नीलाकांता आणि हरमनप्रीत यांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या, मात्र सुरुवातीला त्यांना यश आले नाही. त्यानंतर हरमनप्रीतच्या फटक्याची दिशा मलेशियन खेळाडूमुळे बदलल्याने भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. ४२व्या मिनिटाला हार्दिक सिंगने ही संधी साधत गोल केला आणि भारताची आघाडी ३-१ अशी केली. त्यानंतरही भारतीय संघाने सामन्यावर पकड कायम ठेवत मलेशियावर ५-१ असा विजय मिळवला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीचे सुवर्णपदक पटकावले.