वाशीम,
kanchantai-gadkari संस्कार भारतीने समाज मनावर संस्कार रुजवणे आवश्यक आहे. संस्कार आपण आपल्या घरात पाळल्यास ती सवय संपूर्ण कुटुंबाला लागते. त्यातूनच समाजाची निर्मिती होते, असे प्रतिपादन संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांताध्यक्ष कांचनताई गडकरी यांनी केले. त्या येथील वाटाणे लॉन्स मधील संस्कार भारती विदर्भ प्रांत बैठकीच्या उद्घाटन सत्रामध्ये बोलत होत्या.
यावेळी मंचावर अध्यक्ष कांचनताई गडकरी, ओजस हिरानी, क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, कार्याध्यक्ष सुधाकर अंबुसकर, प्रांतमंत्री विवेक कवठेकर, शहराध्यक्ष पुरुषोत्तम मुंढरे, शहर मंत्री आरती बावणे उपस्थित होत्या. भगवान नटराज यांचे पूजन, संस्कार भारतीचे ध्येय गीत त्यानंतर संस्कार भारती वाशीमच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना कांचनताई गडकरी म्हणाल्या की, संस्कार भारतीच्या कार्यक्रमांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले असता कार्यक्रम यशस्वी होतो. अशी सवय प्रत्येक जिल्हा समितीने लावून घेणे आवश्यक आहे.
संस्कार भारतीने चांगले कार्यक्रम राबवून समाजाचा विश्वास निर्माण करून समाज निर्मिती करणे गरजेचे आहे. यावेळी चंद्रकांत घुरोटे, प्रांत मंत्री विवेक कवठेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिवंगत कलाकार कलावंत व संस्कार भारतीचे सदस्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास संस्कार भारतीचे विदर्भातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्कार भारती रांगोळी व चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.