अरे देवा चक्क माजी मुख्यमंत्र्याना केले 'टार्गेट'

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
बिजनौर,
kamal nath land case मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील सुमारे २६ बिघे जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे दावा करून ती हडपण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही जमीन कमलनाथ यांचे वडील महेंद्रनाथ यांच्या नावावर होती. बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि खोटी वसीयत तयार करून जमिनीवर हक्क सांगण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर नजीबाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 

kamal nath land case former cm 
हे प्रकरण नजीबाबाद तहसीलमधील अमीखानपूर गावातील आहे. महेंद्रनाथ यांच्या नावावर गावातील गाटा क्रमांक ४२९ मध्ये २.१५६० हेक्टर जमीन नोंदवलेली होती. त्यांनी ही जमीन बटाईने दिली होती. दीर्घकाळ कुटुंबातील कोणीही या जमिनीची देखभाल करण्यासाठी गेले नसल्याचा फायदा घेत आरोपींनी जमिनीवर दावा करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कमलनाथ यांनी १८ मे २०२६ रोजी ही जमीन त्यांच्या नावावर वारसाहक्काने नोंदविण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला. त्यानंतर लेखपालाने दिलेल्या अहवालात जमीन वादग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. तसेच धर्मपाल सिंह विरुद्ध ग्रामसभा या जुन्या खटल्याची माहिती आणि जमिनीवर दावा करण्यासाठी सादर करण्यात आलेली वसीयतही तपासात समोर आली.
तपासादरम्यान ७ ऑक्टोबर १९९८ रोजीची एक अपंजीकृत वसीयत जमीन हडपण्यासाठी वापरण्यात आल्याचे आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार ही वसीयत बनावट होती. एवढेच नव्हे, तर महेंद्रनाथ यांच्या नावाने १० एप्रिल २००३ रोजीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्रही तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात महेंद्रनाथ यांचा मृत्यू ७ सप्टेंबर २००४ रोजी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात झाला होता. कथित बनावट मृत्यू प्रमाणपत्रात कमलनाथ यांच्या आईचे नावही चुकीचे नमूद करण्यात आले होते. या कागदपत्रांच्या आधारे सुमारे २६ बिघे जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.
कमलनाथ यांच्या तक्रारीत महावतपूर बिल्लौच येथील धर्मपाल सिंह, नजीबाबाद येथील विजय शंकर पांडे, जसबिंदर सिंह ढिल्लों तसेच लेखपाल डेव्हिड कुमार यांच्यासह अन्य व्यक्तींवर कथित कटात सहभागी असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. जमिनीची दीर्घकाळ देखभाल होत नसल्याचा फायदा घेत उर्वरित जमीनही परस्पर हस्तांतरित किंवा खुर्दबुर्द करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या आधारे नजीबाबाद पोलिसांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी धर्मपाल सिंह आणि विजय शंकर यांना अटक केली. प्रकरणातील अन्य नामनिर्देशित आरोपींची भूमिका तसेच जमिनीवर दावा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कथित बनावट कागदपत्रांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.