मराठीला ज्ञानभाषा बनविण्यासाठी डिजिटल युगात व्यापक प्रयत्नांची गरज- मुख्यमंत्री

अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा दिमाखात शुभारंभ

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
मुंबई,
marathi bhasha gaurav din‘मराठी ही केवळ संपर्काची भाषा नसून संस्कृतीची वाहक, इतिहासाची साक्षीदार आणि विचारांची भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा केवळ अभिमान न बाळगता तिला ज्ञानभाषा बनविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 

marathi 
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या वतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंत, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. हेमलता बागला आदी उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने विविध ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर २०२४ मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हा दर्जा केवळ गौरवाचा विषय न ठेवता त्यातून मराठी भाषेचा विकास साधणे आवश्यक आहे.
 
 
मराठी भाषेच्या समृद्धीवर भाष्य करताना फडणवीस यांनी मराठीतील विपुल शब्दसंपदेचा उल्लेख केला. मराठी भाषेतील शब्दकोश आणि ज्ञानकोशांच्या माध्यमातून उपलब्ध असलेली शब्दसंपदा अधिक व्यापक पद्धतीने संकलित व प्रकाशित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या मराठी शब्दकोशाच्या माध्यमातून उपलब्ध शब्दसंपदा वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाषा संपली की त्यासोबत एक संस्कृती, एक विचार आणि एक सभ्यता संपते. त्यामुळे भाषा जिवंत ठेवायची असेल तर तिचा सातत्याने वापर, वावर आणि संशोधन होणे आवश्यक आहे,’ असे फडणवीस यांनी नमूद केले.
 
 
डिजिटल विश्वात मराठीचा ठसा उमटविण्याचे आवाहन
आजच्या डिजिटल युगात संवादाची माध्यमे वेगाने बदलत आहेत. त्यामुळे डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पीच-टू-टेक्स्ट, अनुवाद तंत्रज्ञान, ओटीटी आणि समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात मराठी कंटेंट निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी अशा आधुनिक क्षेत्रांमध्ये मराठीतील ज्ञानसंपदा निर्माण करावी लागेल. तरच मराठीला ज्ञानभाषेच्या रूपात सक्षम करता येईल,’ असे फडणवीस यांनी सांगितले. मराठीतील अभिजात साहित्य केवळ मराठी भाषिकांपुरते मर्यादित न ठेवता आधुनिक अनुवाद तंत्रज्ञानाच्या मदतीने ते इतर भारतीय तसेच जागतिक भाषांमध्ये पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.