अनिल कांबळे
नागपूर,
nagpur court शेजाऱ्यांशी गप्पा मारत बसलेल्या प्रेयसीला घरात बोलावल्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने वाद घातला. त्यामुळे रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात विट घालून खून केला. कपीलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या हत्याकांडात आरोपी प्रियकराला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. सलमान आझमी यांनी हा निर्णय दिला. मोहम्मद जावेद मोहम्मद युसुफ शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. सारिका शंकर पटेल (वय ३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव होते. ती आरोपीसोबत सात-आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहत होती. मो. जावेद हा विवाहित होता तसेच सारिकासुद्धा विवाहित होती. सारिकाचे जावेदसोबत सूत जुळले. त्यामुळे सारिकाने आपल्या पतीला सोडून दिले होते. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सारिका शेजाऱ्यांशी गप्पा करीत बसली होती. बराच वेळ झाल्यानंतर जावेदने तिला घरात बोलावले. मात्र, ती घरात आली नाही. त्यामुळे जावेदने तिचा हात धरुन घरात नेले. शेजाऱ्यांसमोर अपमान झाल्यामुळे सारिकाने त्याला अश्लील शिवीगाळ केली आणि ती पुन्हा घराबाहेर पडू लागली. त्यावेळी आरोपीने रागाच्या भरात बाजूला पडलेली वीट उचलून सारिकाच्या डोक्यावर फेकून मारली. वीट डोक्याला लागल्याने सारिका रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. न्यायालयात सरकारी वकील अॅड. आसावरी परसोडकर यांनी विविध ठोस पुरावे सादर करून आरोपीचा गुन्हा सिद्ध केला.
प्रेमसंबंधाचा दु:खद अंत
जावेदने सारिकाचा खून केल्यानंतर अटकेच्या भीतीमुळे शेजारी आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सारिका पहिल्या माळ्यावरून खाली पडल्याचा बनाव त्याने केला. तिला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना संशय आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीचा बनाव उघडकीस आला. प्रेयसीच्या हत्याकांडात प्रियकराला अटक केली. त्याने खून केल्याची कबुली दिली. अशाप्रकारने प्रेमाचा दु:खद अंत झाला.