डॉक्टरकडून तरुणीचे दोन वर्षे लैंगिक शोषण

- फेसबुकवरुन झाली होती ओळखी

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime शहरातील २७ वर्षीय तरुणीशी फेसबुकवरुन ओळखी झालेल्या मध्य प्रदेशातील २८ वर्षीय डॉक्टरने दोन वर्षे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपी डॉक्टरने नकार देत धमकी दिली. याप्रकरणी सदर पोलिसांनी डॉ. संजय सुधीर विश्वास (वय २८, रा. बिछुआ, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ६९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 

nagpur crime  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर डॉक्टरने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तरुणीने लगेच नकार दिला. त्यानंतर डॉक्टरने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. लग्नाचे आश्वासन दिल्यामुळे तरुणी शारीरिक संबंध ठेवण्यास तयार झाली. त्यानंतर डॉक्टरने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. १ सप्टेंबर २०२४ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सदर परिसरातील एका भाड्याच्या घरात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. जवळपास दोन वर्षे आरोपीने लग्नाचे आश्वासन देत संबंध ठेवले, असे पीडितेने पोलिसांना सांगितले. काही काळानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, त्याने लग्न करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर तिला धमकीही दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडितेने सदर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम ६९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सदर पोलिस करीत आहेत.