पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या

पॅरोलवरील कैद्याच्या प्रेमकहाणीचा रक्तरंजित अंत

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur crime एका युवकाच्या खून प्रकरणात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आलेल्या एका कैद्याचे नातेवाईक युवतीशी सूत जुळले. दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना शुक्रवारी कपीलनगरात उघडकीस आली. रोशन किशोर शहाकार (वय ४२, रा. न्यू म्हाडा कॉलनी) असे आरोपीचे नाव असूनलक्ष्मी (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे.
 

nagpur crime husband allegedly kills wife over character suspicion in kapilnagar 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रोशन हा आपल्या पत्नी लक्ष्मीला बेशुद्धावस्थेत मेयो रुग्णालयात घेऊन आला. डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयातून मेडिको-लीगल केस (एमएलसी) अहवाल कपिलनगर पोलिसांना पाठविण्यात आला. पोलिसांनी दाम्पत्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता रोशनच्या घटना सांगताना विसंगती आढळून आली. त्याची कसून चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयातून लक्ष्मीची हत्या केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. २००६ मध्ये पाचपावली परिसरात झालेल्या खून प्रकरणात रोशन आणि त्याचा भाऊ आरोपी आहेत. याच प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या रोशनच्या भावाची यावर्षी जानेवारी महिन्यात कारागृहातून सुटका झाली होती. तर रोशन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पॅरोलवर बाहेर आला होता. कपिलनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पॅरोलवर असताना जुळले प्रेमसंबंध
लक्ष्मी ही रोशनची नातेवाईक होती. आठ वर्षांपूर्वी रोशन पॅरोलवर बाहेर आला असताना दोघांची जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. या दाम्पत्याला दोन अपत्ये झाली. दरम्यानच्या काळात रोशन पुन्हा पॅरोलवर बाहेर आल्याची माहिती आहे. पॅरोलवर सुटल्यानंतर रोशन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अशाच एका वादादरम्यान रोशनने रागाच्या भरात लक्ष्मीवर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे.
.