अनिल कांबळे
नागपूर,
private video १९ वर्षीय तरुणीचा खासगी व्हिडीओ कॉल तिच्या नकळत स्क्रीन रेकॉर्ड करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड करुन व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. राहुल छत्रपती धुर्वे (वय २३, रा. पंचधारा धरण परिसर, रिढोरा, ता. सेलू, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपीशी एका विवाह सोहळ्यात ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. पुढे त्यांच्यात फोनवरून तसेच व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. याचदरम्यान आरोपीने तरुणीसोबत झालेल्या खासगी व्हिडीओ कॉलचे तिच्या नकळत स्क्रीन रेकॉर्डिंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्याच नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून त्यावर हा व्हिडीओ अपलोड केला. आपला खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्याची माहिती तरुणीला तिच्या भावाकडून मिळाली. या प्रकारामुळे आपली बदनामी झाली असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर तरुणीने बेलतरोडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७७ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ई) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.