नागपूर
Nagpur Graduate Constituency Election 2026नागपूर पदवीधर मतदारसंघ हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या मतदारसंघाशी भावनिक नाते आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधराव फडणवीस याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून यायचे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील महाराष्ट्राच्या विधिमंडळात याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून आपली ताकद झोकून दिली आहे.
परिणामी यंदा गेल्या वेळेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून थेट मतदारांशी संपर्क अभियान सुरु केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर वॉररूम कार्यालयात उभारण्यात आलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून रोज चाळीस हजार मतदारांशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे आता भाजपने ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केल्याचं दिसून येत आहे.
एकीकडे काँग्रेस पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी आपले तीन उमेदवार जाहीर केले असून या वर्षी नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. काँग्रेस पक्षाने माज्यावर जो विश्वास टाकला ते अपेक्षित होता. मात्र या निवडणुकीत फक्त काँग्रेस मैदानात नाही, तर सरकारविरोधी समविचारी सर्व संघटना माझ्यासाठी मैदानात उतरल्या असल्याचे आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले.
त्यामुळे एकप्रकारे भाजपपुढे काँग्रेसने मोठं आव्हान उभं केलं असताना भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे हे आव्हान नेमकं कोण स्विकारतं आणि भाजपला कसा विजय खेचून आणून देतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण नितीन गडकरी आणि गंगाधरराव फडणवीस यांनी या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलेलं असल्याने भाजपासाठी ही जागा जिंकणे प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे भाजपाही आपला तगडा उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे.