वडिल आरोपी आहे म्हणून मुलाला गुन्ह्यात अडकवणे योग्य नाही

उच्च न्यायालयाचे निरीक्षण : वडिलांवर खटला चालवा, मुलगा दोषमुक्त

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
nagpur high court अवैध सावकाराने पैशाच्या वसुलीसाठी छळ केल्यामुळे कर्जदाराने आत्महत्या केली. या गुन्ह्यात अवैध सावकारासह त्याच्या मुलावरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ‘वडिलांवर आरोप असेल तर मुलगासुद्धा दोषी असेल असे नव्हे. वडिल आरोपी आहे म्हणून मुलाला गुन्ह्यात अडकवणे योग्य नाही, असे निरीक्षण एका प्रकरणात उच्च न्यायालयाने नोंदवत मुलाला दोषमुक्त केले. मात्र, त्याच्या वडिलाला आणि साथिदारावर खटला चालविण्याचे आदेश कायम ठेवले.
 

nagpur high court: son discharged in abetment of suicide case against alleged illegal moneylender 
काटोल (जि. नागपूर) येथील रहिवासी शाहजी राऊत यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान १ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नरखेड पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ३९, ४४ आणि ४५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मृताच्या जवळ मिळालेल्या चिठ्ठीत सुरेंद्रसिंह ठाकूर आणि सुमित चांडक या सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. आरोपी विनापरवाना सावकारी करत होते आणि अव्वाच्या सव्वा व्याजाची मागणी करून मानसिक त्रास देत होते, असा आरोप होता. सरकारतर्फे अ‍ॅड. कौस्तुभ लुले यांनी बाजू मांडली.

न्यायालयाचे निरीक्षण
सत्र न्यायालयाने आरोपींचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला होता. याविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात पुनर्रीक्षण याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेतली. सुरेंद्रसिंह ठाकूर आणि सुमित चांडक यांच्याबाबत कोर्टाने नमूद केले की, सुसाईड नोट, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून दोन्ही आरोपींचा छळ व सततच्या फोन कॉलचा थेट सहभाग दिसून येतो. त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोर्टाने त्यांची पुनर्रीक्षण याचिका फेटाळली.
 
 
नात्यामुळे गुन्ह्यात अडकवता येत नाही
 
 
अंशू ठाकूर हे केवळ मुख्य आरोपी सुरेंद्रसिंह ठाकूर यांचे पूत्र आहेत. सुसाईड नोट किंवा साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अंशू ठाकूर यांनी स्वत: फोन केल्याचा किंवा छळ केल्याचा कोणताही थेट पुरावा आढळला नाही. केवळ नात्यामुळे कोणाला गुन्ह्यात अडकवता येत नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने त्यांना या गुन्ह्यातून दोषमुक्त केले. कोर्टाने नागपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा १६ मार्च २०२४ चा आदेश अंशत: बदलून आरोपी अंशू ठाकूर यांना दोषमुक्त केले, तर सुरेंद्रसिंह ठाकूर व सुमित चांडक यांच्यावरील खटला सुरू ठेवण्याचे आदेश दिले.