नागपूर,
New English High School's Initiative गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलावैभवाची ओळख करून देणारा सोहळा. याच संकल्पनेला अभिनव शैक्षणिक उपक्रमाची जोड देत महाल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘विश्वरूप गणेश दर्शन’ हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतासह जगभरातील विविध देशांमधील गणेशरूपांची आणि तेथील गणेश परंपरांची माहिती जाणून घेतली आहे. गणपतीची स्थापना करण्यात आलेल्या परिसरात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने भारतासह विविध देशांतील गणेशमूर्ती, मंदिरे आणि गणेश परंपरांची माहिती देणारी आकर्षक भित्तीपत्रके तयार केली आहेत.

सिंगापूरमधील श्री सेनपागा विनायगर मंदिर, टोरोंटो येथील श्री वरसिद्धी विनायगर मंदिर, मेलबर्न येथील श्री वक्रतुंड विनायगर मंदिर तसेच जपानमधील कांगितेन गणपती यांसह काठमांडू खोऱ्यातील गणेश परंपरेचीही माहिती विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकांच्या माध्यमातून मांडली आहे. त्यामुळे या देखाव्यातून विद्यार्थ्यांना एका अर्थाने जगभरातील गणेशदर्शनाची सफर घडत आहे. अश्विनी कापकर, श्वेतल पराडकर, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका पाठक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कान्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. गणेशोत्सवाच्या काळात शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमही राबविण्यात येत आहेत. ‘विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध परंपरांची ओळख व्हावी, त्यांची कलात्मकता विकसित व्हावी आणि विविध संस्कृतींबाबतची जिज्ञासा वाढावी,’ या उद्देशाने ‘विश्वरूप गणेश दर्शन’ हा उपक्रम राबविण्यात आला.