सडक अर्जुनी,
police-personnel-dies गांधी जयंतीचे बंदोबस्त आटोपून घरी परत जात असलेल्या डूग्गीपार पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचार्यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील तिडका फाटा परिसरात घडली. ताराचंद दामाजी माहूरे (५७) असे मृत पोलिस कर्मचार्यांचे नाव आहे.

माहूरे हे तहसील कार्यालयातील गांधी जयंतीचे बंदोबस्त आटोपून दुचाकी क्रमांक एमएच ३६ व्ही ८०२३ ने सौंदडकडे जात असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास महामार्गावरी तिडका फाट्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणार्या ट्रक क्रमांक एमएच ४९ सीडब्ल्यू १९३७ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर भंडारा येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपूर येथे हलविताना रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. माहुरे यांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच डूग्गीपार पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अपघातग्रस्त ट्रक व ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.